‘मिशन राणीगंज’ एक सत्य घटना
राणीगंज एका सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे. ज्यात प्रमुख भूमिकेत अक्षय कुमार आणि परिणीती चोपडा आहे. चित्रपटाची कथा एका खाणीत काम करणाऱ्या मजुरांची आहे जे एक दिवस खाणीत काम करताना फसून जातात. आता त्यांना वाचायचं कसं असा प्रश्न खाणीचे मालक व इतरांना पडतो. त्या कामाचा इंजिनिअर असणारा अक्षय कुमार हा एक प्लान सुचवतो पण त्याचे वरिष्ठ ऐकत नाहीत. परंतु अक्षय त्यांना समजावून मंजुरी मिळवतो. आता त्या अटकलेल्या मजुरांना खाणीतून अक्षय कसा वाचवणार? त्याला त्यासाठी कोणकोणत्या अडचणी येणार? या सर्व गोष्टी तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळतील.
चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात
चित्रपटाची कथा तर चांगलीच आहे. कारण ती सत्य घटनेवर आधारित आहे. शिवाय पटकथा देखील उत्तम आहे. अतीशय बारीक-सारीक गोष्टींचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. सोबतच संवादही एकदम आपलेसे वाटतात जे या चित्रपटात गरजेचे होते. कुठल्याही चित्रपटाचा सीन तेव्हाच उत्तम होतो जेव्हा दिग्दर्शन आणि सोबतच पार्श्वसंगित भक्कम असतं. या चित्रपटात ते दिसून येतं. या चित्रपटात पार्श्व संगीत उत्तम असून चित्रपटाचा एक-एक सीन अंगावर शहारे आणणारा आहे.
उत्तम अन् दमदार अभिनय
अभिनयाबद्दल बोलणं झालं तर अक्षय आणि परिणीतीने आपल्या वाटेला आलेली भूमिका छान केली आहे. तसेच ही भूमिका अक्षयशिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही असं दिसून येतं. त्यासह अन्य कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका छान साकारलीय. जे खाणीत फसले आहेत त्या कलाकारांच्या भावना तर जिवंत वाटतात पण जे खाणीच्या बाहेर आहेत त्यांचीही धावपळ अभिनयातून खरी दिसून येते.
उत्सुकता शिगेला पोहोचवणारा चित्रपट
दिग्दर्शन सुद्धा अप्रतिम झाले आहे. कारण खाणीमध्ये शूट करताना एक-एक सीन प्रेक्षकांना कसं बांधून ठेवेल याकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिलेलं दिसून येतं. एक से एक एक थरार या चित्रपटात आहेत. लहानमोठ्या सर्वच घडामोडी चित्रपट बघताना आपल्याला बांधून ठेवतात. एक सत्य घटनेवर आधारित फिल्म पुढे काय होणार ही उत्सुकता वाढवून ठेवण्यात यशस्वी ठरते. अक्षय कुमार या चित्रपटासह पुन्हा एकदा सरदारजीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल यात शंका नाही.