‘चितांग’ अहिराणी चित्रपट गीतांचे विमोचन
धुळे : आयमन फिल्मस प्रस्तुत आरिफ शेख यांची निर्मिती असलेला आणि दिग्दर्शक फैज अहमद यांनी दिग्दर्शित केलेला ‘चितांग’ या अहिराणी चित्रपटातील गीतांचे जेष्ठ कथा गीतकार, लेखक विश्राम बिरारी यांच्या हस्ते धुळ्यात पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी चित्रपटाचे कथा, पटकथा लेखक व दिग्दर्शक फैज अहमद, जेष्ठ कलावंत विश्वासराव भामरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील, नाट्य-चित्रपट कलावंत भटू चौधरी, सुभाष शिंदे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलींद बैसाणे, सचिव सचिन बागुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
फैज अहमद यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी ‘चंदन’ हा पहिला अहिराणी चित्रपट दिग्दर्शित केला होता. मोठ्या कालावधीनंतर अथक परिश्रमातून त्यांनी आता ‘चितांग’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील ‘दन दन करत चालनं हाई गाडं’ व ‘कीतल्या मार्शल गाड्या हो शिट्ट्या’ या दोन गीतांचे पत्रकार परीषदेत विश्राम बिरारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. येत्या २७ ऑक्टोबर रोजी ‘चितांग’ हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज येथे प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात मुंबईतील स्टार कलाकारांसह खान्देशातील अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. सामाजिक व कौटुंबिक विषयावरील हा चित्रपट आहे. खान्देशातील अहिराणी व मराठी भाषिक कुटुंबांनी एकत्र येऊन हा चित्रपट अवश्य पाहावा असे आवाहन यावेळी फैज अहमद यांनी केले.