मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा, आरक्षणासाठी सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम
धुळे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे शनिवारी भव्य सभा पार पडली. १५० एकरहून अधिक जागेत पार पडलेल्या या सभेला लाखो मराठा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्तें यांच्यावर सडकून टीका केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा तपशीलवार मांडल्या.
महत्वाच्या मागण्या अशा : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत असलेल्या जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात. दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. तो अद्याप करण्यात आलेला नाही. हे सर्वेक्षण करुन ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात. याशिवाय, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून आरक्षण दिले तर वेगळा प्रवर्ग करुन ते द्यावे. ते एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गाप्रमाणेच टिकणारे आरक्षण हवे. अन्यथा आम्ही ते आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. (छायाचित्र : सौजन्य Facebook)
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? : समस्त मराठा समाजाच्यावतीने माझी सरकारला विनंती आहे की, समितीचा, पुराव्याचा घाट घालू नका. मराठा समाज आता सहन करू शकत नाही. २४ ऑक्टोबरनंतर मराठे मागे हटणार नाहीत. मराठे एकवटले असून त्यांना रोखणे आता अशक्य आहे. मराठ्यांना अंगावर घेऊ नका. मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना आरक्षण दिले, तर गुलालाचे ट्रॅक्टर दिल्लीपर्यंत येतील. मराठा समाज एकत्र होत नाही, हे बोलणाऱ्यांना आजच्या लाखोंच्या गर्दीने उत्तर दिले आहे. सरकारला ४० दिवस दिले होते. त्यातील १० दिवस अद्याप शिल्लक आहेत. त्यानंतर तुम्हाला काही विचारणार नाही. आरक्षण दिले नाही तर सरकारला दाखवून देऊ. गोरगरीब मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने तातडीनं घेतला पाहिजे. मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती बंद करावी. केंद्राने आणि राज्याने मराठ्यांना जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे.
लोक १० रूपयेही देत नाहीत, असे भुजबळ म्हणतात. तुम्हाला लोक पैसे देत नसतील. गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला मोठे केले. त्या लोकांचे रक्त पिऊन पैसे कमवण्याचे काम तुम्ही केले. म्हणून तुमच्याकडे धाड पडली. गोरगरीब मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे दोन वर्षे जेलमध्ये बेसन खावे लागले, अशी बोचरी टीका मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली. एकजण म्हणतो, जरांगे पाटलांना अटक करा. मला अटक करणे सोपे आहे का? गुणरत्न सदावर्तेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यावी, असेही जरांगे पाटील म्हणाले. २३ ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर मी एवढे टोकाचे उपोषण करणार की, यामुळे एकतर माझी अंत्ययात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघणार, असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. (छायाचित्र : सौजन्य Facebook)