इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल
शिरपूर : गणपती विसर्जनाच्या व्हीडीओत छेडछाड करीत आक्षेपार्ह उल्लेख करून भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका इन्स्टाग्रामवर अकाऊंट धारकावर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वैभव रामेश्वर सोनवणे (वय 23, रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार, शिरपूर) या तरूणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान ‘किंग लाला 302’ या इन्स्टाग्राम आयडी धारकाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जय मातादी सांस्कृतिक मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या व्हीडीओमध्ये छेडछाड केली. आक्षेपार्ह भाषेत उल्लेख करून भावना दुखावतील व वेगवेगळ्या गटात शत्रुत्व वाढविण्याचा प्रयत्न करून त्या व्हीडीओची पोस्ट फिर्यादीच्या अकाऊंटवर टाकली. पोस्ट टाकल्याचे कारण विचारले असता त्या आयडी धारकाने फिर्यादीस मॅसेज पाठवून आक्षेपार्ह भाषेत उल्लेख करून भावना दुखावल्या. तसेच इंस्टाग्राम अकाऊंटमध्ये बदल करून पुरावा नष्ट केला.
गुन्ह्याचा पुढील तपास पीआय आगरकर करीत आहेत.