धुळे शहरात डेंग्यूचे थैमान, शिवसेनेने महापालिकेबाहेर रचली चिता
धुळे : शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. एवढेच नव्हे तर सत्ताधारी आणि प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून महापालिकेच्या प्रवेद्वाराजवळ चिता रचण्यात आली. शिवसेनेच्या (उबाठा) या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले.
शिवसेनेने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या १५ दिवसात धुळे शहरात साथीच्या आजारांसह डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. खासगी रुग्णालये, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय यात मलेरिया व डेंग्यूचे शेकडो रुग्ण दखल होत आहेत. गेल्या आठवडाभरात खाजगी रुग्णालयात तीन ते चार रुग्ण दगावले असून, शहरातील देवपूर, चितोड रोड, मोगलाई, आझादनगर तसेच ११ गावातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात एक ते १५ ऑक्टोंबरपर्यंत १५ तर सप्टेंबरमध्ये ४५ आणि आक्टोबरमध्ये ५४ संशयित रुग्ण आढळून आले. त्यामुळे किमान चार ते पाच दिवसाआड पाणी सोडणे गरजेचे आहे. या याबाबत देखील महानगरपालिका प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. येणाऱ्या आठवड्यात धुळे शहरातील विविध प्रभागात मनपाने अंबेटिंग, धुरळणी, फॉगिंग यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यान्वित करावी आणि डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवावे, अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना देण्यात आले.
यावेळी उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, भगवान करनकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, देविदास लोणारी, भरत मोरे, प्रफुल्ल पाटील, ललित माळी, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा