साखर कारखानदार, भांडवलदारांकडून ऊसतोड मजुरांची पिळवणूक
धुळे : आदिवासी भिल्ल समाज बांधवांना ऊस तोडणी मजूर म्हणून घेवून जाण्यासाठी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुपने हरकत घेतली आहे. तसेच ऊसतोडणी मजुरांवरील अन्याय रोखण्यासाठी समान तपासणी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे.
याबाबत आदिवासी कांती सेना प्रणित बापजी ग्रुप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आमची संघटना आदिवासी व मागासवर्गीय संवर्गातील समस्त समाज बांधवांसाठी सामाजिक कामे करीत आहे. या सामाजिक कामासाठी समाज बांधवांना संरक्षण व त्यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणीक उन्नती साधण्यासाठी सदरची ध्येय समोर ठेवून काम करीत आहे. भिल्ल आदिवासी समाजात निरक्षतेचे प्रमाण जास्त असल्याने समाज बांधवांवर मजूर म्हणून काम करण्याची वेळ येते. याच बाबीचा गैफायदा घेवून भांडवलदार, कारखानदार, व्यवसायिक, खाजगी मुकादम म्हणून नियुक्ती असलेले व्यक्ती हे आदिवासी समाजाच्या मजुरांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतात. मजूर म्हणून त्यांच्याकडून जास्तीत-जास्त कामे करून घेतली जातात. त्याबाबत असलेला मोबाईला योग्य प्रमाणात देत नाहीत. आदिवासी मजुरांना कारखानदार तसेच मुकादमांकडून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत चौकशी होण्याकरिता आदिवासी क्रांती सेना संघटनेमार्फत युवकांची तपासणीसाठी निवड होणे आवश्यक आहे.
ऊसतोडणी मजुरांच्या समस्या अशा : राज्यात साखर कारखाना आणि काही खाजगी मुकादम ऊस तोडणीसाठी आदिवासी मजुरांची इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करीत असतात. वाहतूक करणारी वाहने अतीशय जुनी असतात. ट्रॅक्टर, ट्रक, आयशर या वाहनांचा विमा देखील नसतो. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास मजुरांना भरपाई मिळत नाही. तसेच मजुरांची नोंद नसल्याने त्यांना जिवानिशी जावे लागते. आदिवासी मजुरांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना मजूर मूल्य ठरविता येत नाही. अतीशय कमी मजुरीवर भांडवलदार त्यांच्याकडून काम करून घेतात. कामाच्या ठिकाणी अन्न आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था नसते. त्यामुळे मजुरांचे शारीरिक हाल होतात. कुठल्याही सोयी-सुविधा मालक उपलब्ध करून देत नाहीत. ऊस तोडणीसाठी कुटुंब स्थलांतर करीत असतात. त्यात काही गर्भवती महिला देखील असतात. त्यांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही दवाखान्यात त्यांची नोंद होत नाही. त्यामुळे आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झालेला आहे. मात्र त्यांना मालकांकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. उसाच्या शेतामध्ये काम करताना आदिवासी मजुरांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होतात. तसेच सर्पदंश होतो. त्यात मजुरांचा मृत्यू होतो. मजुरांबरोबर लहान मुले देखील असतात. त्यांनाही बालकामगार म्हणून मजूर वर्गात सामावून घेतले जाते. त्यांच्याकडून देखील कामे करून घेतली जातात. त्यामुळे बालकामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय मजूर वाहतूक करणाऱ्या मुकादमांकडे अधिकृत पर्वाने नाहीत. भांडवलदार आणि कारखानदारांकडून आदिवासी मजुरांची आर्थिक, सामाजिक, मानसिक, पिळवणूक होत आहे. याबाबत संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मजुरांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तसेच मुकादम यांची चौकशी होणे आवश्यक आहे. वेळोवेळी तशी मागणी करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आदिवासी क्रांती सेना आणि बाबजी ग्रुप संघटनेच्या माध्यमातून मजुरांच्या संरक्षणासाठी युवकांची निवड करण्यात यावी आणि समान तपासणी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी. या कार्यकर्त्यांना शासनाने परवाने तसेच ओळखपत्र अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना पदाधिकारी कुणाल लोंढे, अनिल हिरामण भिल, किरण मगन सोनवणे, किशन नारायण मालचे, रमेश छोटू ठाकरे, राजू युवराज गायकवाड, शुभम लक्ष्मण अहिरे, आकाश अवचित सोनवणे, अजय पांडुरंग भील, भैया आनंदा तलवारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.