“शेतकरी ते आयजी असा माझा प्रवास असल्याने ग्रामीण अर्थकारण व शेतकऱ्यांच्या समस्या मी जाणून आहे. त्या बाबतीत मी संवेदनशिल असून, शेतकऱ्यांना मदतीची भुमिका माझी कायम राहणार आहे.” – डॉ. प्रतापराव दिघावकर
पक्षाने संधी दिल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार : डॉ प्रतापराव दिघावकर
धुळे : भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. दिघावकर यांचे त्याच अनुषंगाने जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. जिल्ह्यातील विविध गावात त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. तीन दिवसात त्यांनी 24 गावांना भेटी दिल्या. त्या माध्यमातून प्रतापरावांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
त्यामुळे या शेतकरी कुटुंबातल्या हक्काच्या माणसाला पाहून सर्वसामान्य नागरिकांचे आनंदाने डोळे भरून आले. तर त्यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेकांनी धास्ती घेतली. सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता व शिपाई म्हणून पक्षासाठी निस्वार्थपणे काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रताप दिघावकर थेट वंचित घटकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडत आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघात 24 गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. कोरडा दुष्काळ, विजेचा प्रश्न, उत्पादनाला भाव तसेच मूलभूत सुविधांबाबत त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला पाहून अनेकांनी प्रतापराव दिघावकरांना पाठिंबा दर्शविला आहे.
डॉ. प्रताप दिघावकर, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या प्लॅनिंग करतात, तर अनेकजण बस झालं काम म्हणून विश्रांती घेत असतात. मात्र या सर्व गोष्टींना डॉ. प्रताप दिघावकर अपवाद ठरत आहेत. डॉ. प्रताप दिघावकर पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गोरगरिबांसाठी काम करण्याचा संकल्प केला आहे. दिघावकर यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे त्यांना शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव आहे. शेतकऱ्यांची झालेली फसवणूक पाहून व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांना न्याय मिळवून दिला आहे.