बापरे! कपाशीच्या शेतात तब्बल एक कोटींचा गांजा!!
धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे १ कोटी पाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे राहणारा देवसिंग वांगाऱ्या पावरा (ह. मु. गोरक्षनाथ पाडा) याने गोरक्षनाथ पाडा शिवारातील शेतामध्ये अवैधरित्या गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करत पीआय हेमंत पाटील यांनी पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. देवासिंग पावरा कसत असलेल्या शेताचा शोध या पथकाने घेतला. तूर आणि कापूस पिकात गांजाच्या 1240 झांडाची लागवड केल्याचे एलसीबीच्या पथकाला दिसून आले. सुमारे ५६ लाख आठ हजार ७५० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी देवसींग पावरा विरुद्ध थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, रवींद्र माळी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भिवखेड शिवारात वन जमिनीवरील शेतात गांजा
थाळनेर पोलिसांनी बभळाज शिवारातील भिवखेड पाडा येथील गांजाच्या शेतीवर कारवाई करत ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपये किमतीचा गांजा जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना भिवखेड पाडा येथे वन जमिनीवर बेकायदा गांजा लागवड केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सचिन हिरे, नायब तहसिलदार मुकेश साळुंखे आणि थाळनेर पोलिसांनी छापा टाकला. भीवखेड पाडा शिवारात मुसा मालसिंग पावरा (रा. महादेवनगर ता. शिरपूर) हा कसत असलेल्या वन जमिनीच्या शेतात भुईमुग पिकात त्याने ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपये किमतीची गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त केली आहेत.
पथकामध्ये यांचा समावेश : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड , अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डिवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पवारा, शामसिंग वळवी, संजय धनगर, भूषण रामोळे, उमाकांत, किरण सोनवणे, दिलीप मोरे, प्रवीण गोसावी, भाऊसाहेब मालचे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा
Comments 1