नगरसेविका पुत्राचा तरूणावर प्राणघातक हल्ला
धुळे : येथील भाजप नगरसेविकेच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री देवपूरातील गोंदूर रस्त्यावर शनी मंदिरासमोरील कॉलनीत घडली. तरूणावर धारदार चाकूने वार करण्यात आला. या घटनेत गोळीबार झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नगरसेविका पुत्रासह तीन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देवपूर पोलिसांनी दाखल केला. हल्ल्यात जखमी अरविंद बैसाणे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महेश नंदुलाल बैसाणे ( वय१८, रा. इंदिरानगर, वाडीभोकर, देवपूर, धुळे) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला झाला. महेश बैसाणे, त्याचा भाऊ अरविंद बैसाणे, मित्र सचिन ठाकरे, यशोरत्न वाघ, चेतन सोनार, रोषन खैरनार आणि अनिकेत हे देवपूरातील जीटीपी स्टॉप येथे गरबा मंडळाच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते गोंदुर रस्त्यावरील शनी मंदिरासमोर असलेल्या कॉलनी रस्त्यावर आले असता मित भामरे (रा. गौतमनगर, वाडीभोकर, धुळे) दादू कपूर (रा. एकतानगर, बिलाडी रोड देवपूर धुळे) आणि प्रतिक वाघ (रा. वाडीभोकर) हे त्यांच्या आठ ते दहा साथीदारांसह आले व अरविंद बैसाणे आणि त्यांचे मित्र बोलत नसल्याच्या कारणावरून त्यांनी बैसाणे यांच्याशी वाद घातला. यांनतर अरविंद बैसाणे याला झापड मारण्यात आली. एकाने अरविंद यास पाठीमागून धरून ठेवले आणि मित भामरे याने त्याच्या जवळील चाॉपरने अरविंदवर वार केले. मित भामरे व दादू कपूर यांनी त्यांच्याजवळील वेगवेगळ्या दोन पिस्तूलमधून महेश बैसाणे याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. परंतू त्या चुकल्याने तो बचावला. चेतन सोनार यालाही धक्काबुक्की केली, असे महेश बैसाणे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.
या फिर्यादीवरून मित भामरे, दादू कपूर आणि प्रशिक वाघ यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०७, ३४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, १८८ सह आर्म ॲक्ट ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील व पोलीस निरीक्षक सतिष घोटेकर यांनी घटनास्थळी भेट देवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा
त्या भाजपा नगर सेविकेचे आणि तिच्या मुलाचे नाव का लपवत आहात? अशी अर्धवट बातमी का देतात? पत्रकार राजकारण्यांना का घाबरतात?