शिरपूर मर्चंट्स बँकेचा चेअरमन अपात्र घोषित
धुळे : शिरपूर मर्चंट्स बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन आणि मॅनेजर संजय कुलकर्णी यांनी पदावर असताना जैन यांचे सख्खे मोठे बंधू हर्षद जयराज जैन यांना जुलै २०२३ या महिन्यात रुपये ३० लाखांचे विनातारण कर्ज बेकायदेशीरपणे दिलेले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी आर्थिक संस्था अधिनियम बँकेच्या उपविधी व नियमाप्रमाणे असे कर्ज बेकायदेशीर असून, या बँकेने सहकार कायद्याच्या कलमाचा व नियमांचा भंग केलेला आहे. यावरून चेअरमन प्रसन्न जयराज जैन हे अपात्र ठरतात, असा शेरा देत सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी प्रसन्न जैन यांचे शिरपूर मर्चंट्स को-ऑप. बँक लि. शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे या बँकेचे संचालक पद १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रद्दचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (१) (ब) व त्याखालील नियम १९६१ मधील नियम ६४ अन्वये हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शिरपूर मर्चंट्स बँक बचाव समितीचे गोपाळ मारवाडी, मोहन पाटील, डॉ. सरोज पाटील, ओंकार जाधव, हिरालाल कोळी यांनी गुरुवार दि. १९ ऑक्टोबर रोजी धुळे येथे पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शिरपूर मर्चंट बँकेच्या वरील सभासदांनी या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. या तक्रारीची चौकशी करून चेअरमन प्रसन्न जैन दोषी आढळून आल्यावर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
मात्र या कारवाईत जैन यांच्यावर कुठलीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पावले उचलणार आहोत, असेही शिरपूर मर्चंट्स बँक बचाव समितीने स्पष्ट केले. या बँकेला ७७ वर्षे पूर्ण होत असून, बँकेचा एनपीए सतत वाढत आहे. त्यामुळे ही बँक ‘क’ वर्गात गेली असल्याचा रिपोर्ट देखील लेखा परीक्षकांनी अहवालात दिला असल्याचे समितीने नमूद केले. ही बँक बुडीत निघू नये, लाखोंचे बेकायदेशीर दिलेले कर्ज वसूल व्हावे, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठी लढा सुरूच राहील, असे समितीने यावेळी स्पष्ट केले.
Comments 1