ऐन दिवाळीत पथविक्रेत्यांना हटविण्याचा घाट
धुळे : शहरात रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना हटविण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, अतिक्रमण हटविण्यासंदर्भात व्यावसायिकांना नोटीस बजावल्या आहेत. परंतु योग्य पूनर्वसन केल्याशिवाय पथविक्रेत्यांना हटवू नये, अशी मागणी आझाद समाज पार्टीने केली आहे.
याबाबत आझाद समाज पार्टीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. टपरी, लोटगाडीवर भाजीपाला विकणारे, रस्त्यालगत व्यवसाय करणारे लहान-मोठे पथ व्यावसायिक किरकोळ व्यवसाय करून कुंटुबाचा चारितार्थ चालवतात. त्यांचा व्यवसाय पैसै कमविण्यासाठी नाही तर पोटाची खळगी भरण्यासाठी आहे. धुळे महानगरपालिकेच्या परवानगीने अनेक वर्षांपासून सदरचा व्यवसाय धुळे शहरामध्ये करत आहेत. आजपर्यंत रहदारीला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. शिवाय नियमितपणे पथकर अदा करणारे व्यावसायिक आहेत. धुळे महानगरपालिका प्रतिदिवशी १५ रुपये घेऊन त्याची पावती आम्हाला देत व्यवसाय करण्याची परवानगी आजपर्यत देत आलेली आहे. दर महिन्याला किमान ४५० रुपये घेतले जातात. पूर्ण शहरातून लाखो रुपयांचा महसूल दर महिन्याला दिला जातो. याचा पुरावा म्हणून पथकर भरलेल्या पावत्या देखील उपलब्ध होत आहेत. असे असताना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटीस प्राप्त झाल्या आहेत.
नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सहा ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रस्ते सुरक्षा समिती, धुळे जिल्हा यांच्यासोबत झालेल्या सभेच्या इतिवृत्तानुसार अर्जदारांचा व्यवसाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत असून वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. परंतू सदरील कारवाई ही एकतर्फी स्वरूपाची आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आणि बाजू ऐकून न घेता सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी नेमकी शारदीय नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रमुख उत्पन्न कालावधीतच व्यवसाय करता येणार नाही. जेव्हा इतर लोक त्यांच्या घरामध्ये सण साजरे करीत असतील तेव्हा व्यवसायातून उत्पन्न न मिळाल्याने उपाशी राहण्याची वेळ येणार आहे. शहराच्या अतिक्रमणविषयी त्याचप्रमाणे वाहतूक नियत्रनासाठी आमचा व्यवसाय बंद करणे, पथ व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यापेक्षा व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे योग्य आहे. महानगरपालिकेचा पथकर वाढविण्यास हातभार लावू शकतो. वाहतुकीला अडचण होणार नाही आणि रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही यासाठी पर्यायी जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून दिल्यास नियोजित जागी व्यवसाय करणे सोयीचे होईल.
ऐन सणासुदीच्या काळात पथ व्यावसायिकांची उपासमार करणारी ही नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आझाद समाज पार्टीचे नेते आनंद लोंढे, सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांच्यासह पथविक्रेत्यांनी दिला.