गुंडगिरी माजविणाऱ्या सजन चौधरीचा बंदोबस्त करा!
धुळे : देवपूरातील भिवसननगरात एका कुटुंबावर हल्ला करून, तरूणासह महिलांना मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. हल्ला करणारा सजन चौधरी आणि त्याच्या कुटुंबाची, साथीदारांची प्रचंड दहशत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. सजन चौधरीचा त्वरीत बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील महिलांनी आणि नागरिकांनी पोलिसांना दिला आहे.
भिवसननगरातील महिलांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. निवेदनात म्हटले आहे की, देवपूरात वाडीभोकर रोडवरील भिवसननगर परिसरातील रहिवाशी असुन आम्ही अनेक वर्षापासुन भिवसन नगर येथे गुण्या गोविंदाने राहत आहोत. सदर परिसरात ९०४ रहिवाशी शासकीय नोकरदार, सेवानिवृत कर्मचारी व व्यावसायिक आहेत. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे भांडण व कुरापत झालेली नाही.
सजन चौधरी नावाचा इसम देखील याच परिसरा आठ ने दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. सदर कॉलनीमध्ये सार्वजनिक वर्गणी गोळा करुन ओपन स्पेसमध्ये साईबाबा मंदिर व बगीचा निर्माण केला आहे. सदर मंदिरामध्ये हा इसम स्वतःची खाजगी मालमत्ता समजून अधिकार गाजवत आहे. कॉलनीवासियांना सतत दमबाजी व दहशत निर्माण करुन मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करीत असतो. तसेच बाहेरुन त्याचे नातेवाईक् व गुंड लोक आणून दहशत पसरवून भितीचे वातावरण निर्माण करतो. कॉलनीतील अनेक कुटुंबाना धमक्या देणे, मंदिराच्या नावाने पैशांची मागणी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे अशा स्वरुपाच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. परंतू त्याच्या दहशतीमुळे तक्रार दाखल करण्यास कोणीही धजावत नाही. तसेच तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिला व पुरुषांना शस्त्राचा धाक दाखवून त्याची पत्नी स्वता:चे कपडे फाडुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देते.
यापूर्वी कॉलनीतील लोकांना मारहाण केलेली आहे. कॉलनीतील शांतताप्रिय कुटुंब किरण श्रीराम बागुल यांच्या परिवारावर काहीही कारण नसताना त्याने बाहेरील त्याचे नातेवाईक व गुंड आणुन त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्या, हॉकी स्टिक, तिक्ष्ण हत्यारासह दगड, विटांसह हल्ला चढविला व त्यांच्या मुलाला फरफटत घराबाहेर ओढुन बेदम मारहाण केली. घराकडे ओढुन नेले व त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या महिला, पुरुषांना मारहाण करुन जखमी करण्यात आले. अशा प्रकारे त्याची दहशत असून लोकांना त्रास देण्यात येत आहे. परंतु त्याचा व परिवाराचा त्रास असह्य झाला आहे. तसेच मुलींची छेड काढणे, घरावर दगडफेक करणे, धमक्या देणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
कॉलनीतील सभ्य लोकांना होणाऱ्या त्रासापासून कायमस्वरुपी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. त्याचा बंदोबस्त न झाल्या मोर्चा, उपोषण, आंदोलने करण्यात येतील, असा इशारा येथील महिला पुरूषांनी दिला. यावेळी नगरसेवक नरेश चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य छोटू चौधरी, माजी उपसरपंच गोविंद चौधरी, मनोहर पाटील, राजेंद्र चौधरी, मिठाराम चौधरी, शंकर चौधरी, मयूर बागुल, हर्षल चौधरी, किशोर संतोष चौधरी, रमेश चौधरी, सुरेखा पाटील, सुजाता चौधरी, कल्पना पाटील आदींसह नागरिक, महिला उपस्थित होते.
हेही वाचा
Comments 1