१४३ वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाला प्रारंभ
धुळे : येथील 143 वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी रथोत्सवाला बुधवारी सकाळी प्रारंभ झाला. श्री बालाजी भगवानचा रथ काढण्याची परंपरा अतीशय जुनीआहे. परंपरेनुसार आरती करून बालाजी रथ उत्सवाला सुरूवात झाली. रथोत्सवानिमित्त नऊ दिवस बालाजींचे वहन काढण्यात येते. कै. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांनी रथाची स्थापना केली व त्या रथात मुर्ती बसउन रथोत्सवाची सुरुवात केली होती.
तब्बल १४३ वर्षांची परंपरा असलेला धुळ्यातील बालाजी रथोत्सवाला आज सुरुवात झाली. खोल गल्लीतील बालाजी मंदिराजवळ सकाळी ११ वाजता अग्रवाल परिवारातील कमलनयन बाबुलाल अग्रवाल व मंगलाबाई कमलनयन अग्रवाल,मयुरेश कमलनयन अग्रवाल, कल्पेश कमलनयन अग्रवाल, सौ.वर्षा मयुरेश अग्रवाल,उज्वला कल्पेश अग्रवाल तसेच अग्रवाल परिवारातील खुशी, योगीता, वैशाली, गोविंदा, कार्तीकेय या लहानग्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.यावेळी भाविकांनी व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष केला. आणि बालाजी रथोत्सवाला सुरुवात झाली. धुळ्यातील बालाजी रथोत्सवावरील मुर्ती ही कै. विष्णूप्रसादजी काकड यांचे आजोबा कै. रामनारायणजी महाराज यांनी आणली होती. कै.रामनारायणजी महाराज यांना श्री भगवान बालाजींनी स्वप्नात दृष्टांत देवून सदरची मुर्ती कोकणातील रत्नागिरी येथे असलेल्या पायपिंपळाजवळील विहिरीत असल्याचे सांगितले होते,त्यानुसाार कै.रामनारायणजी महाराज यांनी ती मुर्ती धुळे येथे आणून तिची विधीवत प्राण प्रतिष्ठा केली होती. तर रथनिर्मितीसाठी राजस्थान येथून उत्तम कारागिर आणून कै.बाबूलाल अग्रवाल यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळेच १४३ वर्षापुर्वी धुळ्यात हा रथ तयार करण्यात आला होता. नवरात्रीच्या उत्सवानंतर विजयादशमी नंतर येणार्या एकादशीच्या दिवशी हा रथ शहराची परिक्रमा करतो. तर रथोत्सवानिमित्त नवरात्रीचे नऊ दिवस आणि विजयादशमीला बालाजीचे वहन शहर परिक्रमा करत असते.
या रथोत्सवानिमित्त पंचक्रोेशीतील भाविक रथाच्या दर्शनासाठी धुळे शहरात येत असतात. तर खोलगल्लीतील बालाजी मंदिरापासून सुरु झालेली रथाची शहर परिक्रमा लकी मेडिकल,चैनी रोड,सन्मान लॉज तेथून आग्रारोडने खंडेराव बाजार पाचकंदिल चौक, शहर पोलिस चौकी,सराफ बाजार,बॉम्बे लॉज कराचीवाला खुंट,फुलवाला चौक महात्मा गांधी पुतळा,सुभाष पुतळा, ग.नं.६ ,राणाप्रताप चौक, भगवा चौक, श्रीराम मेडिकल, सिमा हॅण्डल्युम यामार्गे पुन्हा मंदिराजवळ रथ आल्यानंतर पुर्ण होत असते. या रथोत्सवानिमित्त केळी विक्रेत्यांसह हलवायांची दुकाने ठिकठिकाणी लागली असून रथोत्सवासाठी येणार्या भाविकांना स्वयंसेवी संस्था व दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून महाप्रसादाचे वाटप होत असते.तसेच आग्रारोडवर ठिकठिकाणी या रथाचे स्वागतही करण्यात येते.