आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा, प्रशासनाची तारांबळ, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
धुळे : जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा यासह चार प्रमुख मागण्यांसाठी धुळे आणि साक्री तालुक्यातील शेतकरी, आदिवासी, कष्टकरी आणि महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी तसेच प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रत्येकी आणि एकरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी आणि कांद्याचे वाढविलेले निर्यात शुल्क रद्द करून पूर्ववत करावे या चार प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. कल्याण भवनापासून मोर्चा सुरू झाला. फाशीपूल चौक, बारा पत्थरमार्गे आग्रा रोड आणि जिजामाता, कमलाबाई शाळेकडून हा मोर्चा क्युमाईन क्लबजवळ स्थिरावला. याठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मोर्चामुळे शहराची वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आदिवासी शेतकरी कुटूंबासह आंदोलन कायम ठेवतील, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यासाठी मोर्चेकरी महिला पुरूष आपला संसार सोबत घेऊनच आल्याचे पहायला मिळाले.
या मोर्चाचे नेतृत्व काॅ. सुभाष काकुस्ते, काॅ. किशोर ढमाले, काॅ. सुरेश मोरे, काॅ. हिरामण सोनवणे, काॅ. रतन सोनवणे, काॅ. शिवाजी मोरे करीत आहेत.