मराठा आरक्षण आंदोलनाला आमदारांचा पाठींबा
धुळे : मराठा आरक्षण आंदोलनाला धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी पाठिंबा दिला आहे.
आमदारांनी धुळे येथे आंदोलन स्थळी भेट देऊन सांगितले की, मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी (ता. अंबड जि. जालना) येथे आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे यांनी आरंभलेल्या आंदोलनाला आणि महाराष्ट्रात प्रत्त्येक जिल्ह्यात चालेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. भारतीय जातीग्रस्त समाजात शोषणाचा मुख्य स्रोत जात राहिली आहे. त्यामुळे निम्न जातीयांना योग्य पात्रता असतानाही प्रत्त्येक ठिकाणी संधी नाकारण्याचे काम जाती व्यवस्थेने केले आहे.
मुठभर उच्च जातीयांच्या हाती सत्ता-मत्ता-आणि अधिकार (Power) केंद्रित झाल्याचे गेल्या काही वर्षांपासून सांपासून दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काहीतरी कारण देवून मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविण्यात आलेल्या आहेत. यासाठी संपूर्ण देशभरात जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या मुद्याचा कायमस्वरूपी तोडगा काढता येवू शकतो. महाविकास आघाडीचे सरकार असताना, ‘आमचे सरकार येवू द्या, फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो’, असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हातात येवूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही. हे अपयश झाकण्यासाठी आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न यापूर्वी सरकारने केला होता.
भाजपाचे सत्ताधारी कायमच मराठा आरक्षणाबद्द्ल मराठा समाजाला गाजर दाखवत आले आहेत. याचा जाब विचारल्यावर लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. सुमारे पाच वर्षांपुर्वी नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा मोर्चा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आता देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. यानिमित्ताने आंदोलक मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना जीवनातून उठवायचे ही संघ-भाजपाची कुटील नीती समोर आलेली आहे.
आंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध धुळे जिल्हा AIMIM पक्षाने दि. ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी धुळे कार्यालयासमोर आंदोलन करून केला होता आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला होता.
मागण्या अशा : १) ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. २) जातीनिहाय जनगणना करावी. ३) धनगर-मुस्लीम यांना देखील आरक्षण देण्यात यावे. या मागण्या कायम ठेवून आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.
पाठिंबा पत्र देताना नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक गणी डॉलर, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक आमिर पठाण आणि सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, भोला वाघ, विकास बाबर, निंबा मराठे, संदीप पाटोळे, बाजीराव खैरनार, मनोज ढवळे, भैया शिंदे, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे, राजू इंगळे, अशोक पाटोळे, शाम रायगुडे, राजू काळे, मोहन टकले, विवेक बागुल, विलास ढवळे, अतुल पाटील, प्रदीप जाधव, नाना कदम, प्रकाश चव्हाण, वीरेंद्र मोरे, अशोक सोडके, गोविंद वाघ, संदीप सूर्यवंशी, उल्हास यादव, पप्पू माने, युवराज मंडले, अर्जुन पाटील, श्रीराम जाधव, जितू इथे, संजय पाटील, कैलास मराठे, वामन मोहिते, संजय बगदे, हेमंत जगदाळे, बी. ए. पाटील, रवी नागणे, एस. बी. चव्हाण, उज्वल वाळके, किरण मराठे, भानुदास मराठे, तुकाराम बागुल, विनोद रायगडे, कुणाल फरताडे, अशोक तोटे, अनिल बगदे, देवा पवार, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.