धुळ्याचा लाचखोर शिक्षणाधिकारी रंगेहात!
धुळे : पेसामधून नॉन पेक्षा क्षेत्रात बदली करण्यासाठी उपशिक्षकाकडून ३५ हजाराची लाच स्वीकारताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राकेश दिनकर साळुंखे आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय गोरख पाटील यांना गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे उपशिक्षकाची बदली नॉन पेसा क्षेत्रात करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले होते.
शिरपूर तालुक्यातील रामपुरा जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक पदावर तक्रारदार कार्यरत होते. त्यांची बदली पेसा क्षेत्रातून नॉन पेसा क्षेत्रात करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे अर्ज केला. त्या अर्जावर सीईओ यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा शेरा मारून तो प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर शिक्षणाधिकारी सांळुखे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविण्यासाठी २५ हजाराची लाच मागितली. तर शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), महाले, कार्यालयीन अधीक्षक (सामान्य प्रशासन), पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्याकरिता ६६ हजाराची लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार उपशिक्षक यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला. दुपारी शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे (प्राथमिक) यांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती २० हजाराची मागणी करून वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. तर वरिष्ठ सहायक, विजय पाटील यांनी देखील पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५१ हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्याचा पहिला हप्ता म्हणून ३५ हजाराची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधात धुळे शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश आहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.