रूग्णांच्या सुविधेसाठी नकाने रोड ते विघ्नहर्ता हाॅस्पीटलपर्यंत होणार पूल
धुळे : शहरालगत असलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी नकाने रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटलपर्यंत लहान पुलाचे बांधकाम होणार आहे. या कामाचा शुभारंभ साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
नकाने रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटल दरम्यान एक लहान नाला आहे. या नाल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा वळसा घालून नांल्यातून रुग्णालय गाठावे लागते. यामुळे त्यांची असुविधा होते. त्यामुळे रुग्णांच्या सुविधेसाठी साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळाताई गावीत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावीत यांच्या प्रयत्नाने नकाणे रोड सर्व्हे क्रमांक १५९, विघ्नहर्ता हॉस्पिटल ते नकाणे रोड दरम्यान लहान पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून एक कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी झाला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गजानन गुरुजी, सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, युवा नेते सागर गावित, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. यतीन वाघ, डॉ. तुकाराम पाटील, डॉ. विकास राजपूत, डॉ. राजश्री जाधव, डॉ. आकांक्षा बराकसे, डॉ. मुकेश सूर्यवंशी यांच्यासह हॉस्पिटलमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.