आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले
धुळे : सिंचन विहीरींच्या विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव यांनी गुरुवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांचे नुकसान करणारेच आता सिंचन विहीरींचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याचा टोलाही त्यांनी आमदार कुणाल पाटील यांना लगावला.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिर प्रकरणी अपूर्ण माहितीचा आधार घेत बोलणाऱ्या पुढाऱ्यांनी श्रेय घेण्याच्या नादात शेतकऱ्यांचा बळी घेऊ नये, असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत केले.
धुळे तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून एकही सिंचन विहीर मंजूर झालेली नाही. तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीच्या कामांमध्ये सातत्याने तक्रारी झाल्याने विभागीय चौकशी झाली. बरेच शेतकरी तसेच अधिकाऱ्यांना चौकशींला सामोरे जावे लागले. अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने गेल्या चार वर्षात मग्रारोहयोच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकरी सिंचन विहीरीच्या लाभापासुन वंचित राहिला.
आता नविन शासन निर्णयाचा आधार घेत सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षासाठी पारदर्शी प्रक्रीया पार पाडुन गरजु लाभार्थ्यांस सिंचन विहीर मिळावी या हेतुने सर्व पंचायत समिती सदस्य यांच्या एकमताने सर्व सदस्यांना समान उद्दीष्ट देण्यात यावे. जेणेकरुन तालुक्यातील सर्व गटांमध्ये समान लाभ देता येईल. या व्यापक भुमिकेतुन प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी २० सिंचन विहीरीचे उद्दीष्ट देण्यात आले. परंतु विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनी ही वस्तुस्थिती आणि संपूर्ण प्रक्रीया पुर्णपणे जाणुन न घेता आततायीपणाने विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला व तालुक्यातील शेतकऱ्यांचा बळी घेतला. ही वस्तूस्थिती असतांना तेच आमदार आज शेतकरी हिताच्या गोष्टी करताना दिसत आहेत. त्यांनी जनाची नव्हे तर मनाची लाज बाळगली पाहिजे.
त्यासोबतच काही चमकोगिरी करणारे लोकप्रतिनिधी देखील आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याच्या थाटात भुमिका घेताना दिसत आहेत. आमदार कुणाल पाटील यांच्या तारांकित प्रश्नानंतरही सिंचन विहीरींचे प्रस्ताव सहा महिने धुळ खात पडले होते. तेव्हा त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भातील तळमळ कुठे गेली होती? असा सवालही प्रा. जाधव यांनी या पत्रपरिषदेत उपस्थित केला. विद्यमान आमदार पाटील व चमकोगिरी करणारे लोकप्रतिनिधी यांनी संपूर्ण अभ्यासाअंती शेतकऱ्यांचा कळवळा घ्यावा, असे आवाहनही प्रा. जाधव यांनी केले. तसेच सिंचन विहिरींसंदर्भातील प्राप्त अर्ज, पात्र व अपात्र अर्जाची आकडेवारीही प्रा. जाधव यांनी यावेळी सादर केली. यावेळी सभापती संग्राम पाटील, बीडीओ अकलाडे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा