धुळे जिल्ह्यात तब्बल तीन कोटींचा गांजा पकडला
धुळे : शिरपूर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी गांजाची मोठी शेती सापडली असून, धुळे पोलिसांनी तब्बल तीन कोटी रूपयांचा गांजा पकडला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गेले दोन दिवस दुर्गम भागात ही कारवाई करीत होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गांजाची शेती केल्याप्रकरणी पोलिसांनी देवा कहारू पावरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाला पोलीस अधीक्षकांनी 20 हजार रूपयांचे रोख बक्षीस दिले.
शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान शिवाराध्ये देवा कहारू पावरा हा गांजासदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करून शेती करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी आपल्या पथकासह एक नोव्हेंबर रोजी पावरा यांच्या शेताची छुपी पहाणी केली. गुप्त माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी छापा घातला असता तूर व कापूस या पिकांमध्ये गांजासदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केल्याचे निदर्शनास आले. ही झाडे 3 ते 6 फुटांपर्यंत उंच वाढली असल्याचे दिसून आले. मोजणी केली असता एक हजार 860 झाडांची लागवड केल्याचे उघड झाले. प्रती झाड पाच हजार रूपये किंमतीप्रमाणे या झाडांची किंमत तीन कोटी 10 लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचारी महेंद्र देवरा सपकाळ यांनी देवा कहारू पावरा याच्या विरूद्ध फिर्याद दिली असून, त्याच्या ताब्यातून सहा हजार दोन किलो वजनाचा गांजा सदृश्य वनस्पतीची झाडे ताब्यात घेण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देवा पावरा याच्याविरूद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शिरपूर तालुका सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरीक्षक एलसीबी बाळासाहेब सूर्यवंशी, सुनिल वसावे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, योगेश जगताप, किशोर पाटील, जगदिश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकरे, राजू गिते, राजू ढिसले, स्वप्निल बांगर व प्रकाश अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी जारी केला हेल्पलाईन क्रमांक : अंमली पदार्था संदर्भात 8329161861 या हेल्पलाईन क्रांकावर माहिती पाठवावी. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येवून उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.