‘चितांग’ चित्रपटाचा आज ज्योती टॉकीजमध्ये प्रीमीअर शो
धुळे : आयमन फिल्मस प्रस्तुत आरिफ शेख यांची निर्मिती असलेला आणि दिग्दर्शक फैज अहमद यांनी दिग्दर्शित केलेला ‘चितांग’ या अहिराणी चित्रपटाचा प्रीमिअर शो धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात दि. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती चित्रपटाचे निर्माता आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद धुळेकर यांनी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील, नाट्य-चित्रपट कलावंत भटू चौधरी, कॅमेरामन डीओपी सत्तार शेख, सचिव सचिन बागुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
फैज अहमद यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी ‘चंदन’ हा पहिला अहिराणी चित्रपट दिग्दर्शित केला होता. मोठ्या कालावधीनंतर अथक परिश्रमातून त्यांनी आता ‘चितांग’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांच्या अहिराणी भाषेवरील प्रेमाने भारावून व अहिराणी भाषेसाठी काहीतरी योगदान द्यावं असे मनापासून वाटल्याने या चित्रपटाची निर्मिती केली अशी भावना निर्माता आरिफ शेख यांनी यावेळी व्यक्त केली. 3 नोव्हेंबस रोजी ‘चितांग’ हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज येथे प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर दररोज दुपारी 12 वाजता या चित्रपटाचा शो होणार आहे.
या चित्रपटात मुंबईतील स्टार कलाकारांसह खान्देशातील अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. सामाजिक व कौटुंबिक विषयावरील हा चित्रपट आहे. खान्देशातील अहिराणी व मराठी भाषिक कुटुंबांनी एकत्र येऊन हा चित्रपट अवश्य पाहावा असे आवाहन यावेळी निर्माता आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद यांनी केले आहे.