अक्कलपाडा प्रकल्पातून सातपायरी धरण भरा
धुळे : तालुक्यातील बुरझड येथे असलेल्या सातपायरी हा जलसिंचन प्रकल्प अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून भरण्यात यावा अशी मागणी बुरझड येथील जलसंघर्ष समितीने केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील बुरझड, वडणे, नंदाणे, सायणे ही गावे कायम दुष्काळाशी सामना करत आले आहे. सतत आवर्षणग्रस्त असलेल्या या गावांमध्ये यंदाचे वर्ष अतिशय भयावह आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असे सातपायरी धरण असून या धरणाला पाणीपुरवठ्याचा कुठलाही मुळस्त्रोत नाही. यंदा पाऊस कमी पडल्याने धरण कोरडे आहे. परिणामी अक्कलपाडा डाव्या कालव्यातून हे धरण भरण्यात यावे त्यासाठी ५ टक्के पाणी कायमस्वरुपी आरक्षीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
यावेळी जलसंघर्ष समितीचे एन. डी. पाटील, योगेश पाटील, मच्छिंद्र हिरालाल पाटील, ज्ञानेश्वर तानाजी पाटील, लक्ष्मण पाटील, जगन्नाथ गोविंदा जाधव, सुनिल गोरख पाटील, शरद उत्तमराव पाटील, सुरेश उत्तम सावंत, चुडामण विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर गोारख पाटील, संतोष सखाराम पाटील, दिनेश देविदास पाटील आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले.