चितांग : अस्सल अहिरानी कौटुंबिक फिल्म
एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीची ही कथा आहे, जी प्रत्येकाला आपलीशी वाटेल. यातील संवाद, लोकेशन्स, पात्र इत्यादी सर्वच गोष्टी जणू आपल्यातील कोणी आहे असं दिसून येतं. चितांग हा चित्रपट पूर्णतः शेतकरी कुटुंबावर केंद्रित आहे.
एका छोट्याशा गावात यमुनाबाई आपल्या मुलाच्या लग्नासाठी गावातील सावकाराकडून कर्ज घेते व बदल्यात कोऱ्या स्टॅम्पवर अंगठा देते. मग त्या मुलाचं लग्न थाटात होतं. मुलगा संसारालाही लागतो. पण काही दिवसांनी सावकार मुद्दल पैसे आणि व्याजासाठी कुटुंबाला त्रास देतो व परत स्टॅम्प लिहून सर्व जमीन आपल्या नावावर करून घेतो. यामुळे मानसिक तणावात येऊन बापू जो यमुनाबाईचा मुलगा असतो तो आत्महत्या करतो. अशा परिस्थितीत यमुनाबाई देखील आजारी पडते. बापू गेल्यावर पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आणि या सर्व परिवाराची जबाबदारी सिंधूवर येऊन ठेपते. पण काही दिवसांनी यमुना व तिची मुलगी बबली हे देखील तिला सोडून जातात. आता सिंधू आपला मुलगा अजयला घेऊन शेती करून आपला उदरनिर्वाह करत असते. सावकारामुळे पतीने केलेली आत्महत्या व त्यांच्यापाठोपाठ मुलगी आणि सासू हे देखील गेल्याने एकटी पडलेली सिंधू आपल्या मुलाला कसा मोठा करेल आणि मुलगा मोठा झाल्यावर आपली जमीन परत आपल्या नावावर करेल का ?सावकाराकडून आपलं गेलेलं सर्व वैभव परत मिळवेल का? हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.
चित्रपटाची कथा ही सर्वसामान्य कुटुंबातील आहे. अस्सल अहिरानी, गावरानी भाषा असल्याने चित्रपटाची स्टोरी आपलीशी वाटते. अहिरानी भाषेतील गोडवा आणि ज्या पद्धतीने बोलली जाते ते मोठ्या पडद्यावर बघताना खूप सुंदर अनुभव येतो.
पटकथा ठीक आहे. काही सीन कमी करता आले असते तर प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात आणखीन यशस्वी झाले असते. संवाद प्रकाश पाटील यांचे आहेत. अहिराणी भाषेत असल्याने ते आपलेसे वाटतात. चित्रपटात गाणी खूप आहेत आणि काही गाणे आपले धुळे शहरातील सुप्रसिद्ध गायक पारिजात चव्हाण आणि डॉ. गायत्री चव्हाण यांनी गायिले आहेत.
चित्रपटातील सर्व पात्रांनी आपल्या वाटेला आलेली भूमिका छान साकारली आहे. चित्रपटामध्ये येणारे छोटे छोटे इमोशनल सीन्स छान वाटतात. पण काही ठिकाणी गाण्यांचा अतिरेक हा बोरिंग वाटतो.
दिग्दर्शन फैज अहमद धुळेकर यांनी केलेला खरंतर कौतुकास्पद आहे. सर्व पात्रांना घेऊन अशी कथा निर्माण करणं जी कथा आपण या आधी देखील पाहिली असेल. त्यांचा हा प्रामाणिकपणा दिग्दर्शनात दिसून आला. गावातील लोकेशन अस्सल खानदेशी टच चित्रपटाची खास बाजू आहे. छायांकन देखील छान झाले. गावाकडील लोकेशन, शेती, गाय, बैल, बैलगाडी इत्यादी सर्व दृश्य कॅमेऱ्यामध्ये छान टिपले गेलेत आणि ते बघताना आपल्याला देखील तो अनुभव येतो. गावाकडील जीवन आपण सर्वच जगलोय असा अनुभव हा चित्रपट बघताना येईल.
एकंदरीतच मोठमोठ्या चित्रपटांसमोर अहिरानी चित्रपट प्रदर्शित होणं हेच महत्त्वाचा आहे व आपण देखील हा चित्रपट बघावा आणि आपल्या बोली भाषेचा आनंद घ्यावा…