पाच हजार आदिवासी महिलांना सोलर मशीन देणार!
धुळे : आदिवासी विकास विभाग व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाकरीता पाच हजार आदिवासी महिलांना बचतगटाच्या माध्यमातून लवकरच सोलर मशीन देण्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी रविवारी शिरपूर येथे केली.
विठ्ठल लॉन्स, शिरपूर येथे आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने आयोजित महिला बचत गट मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महिला बचतगटांच्या प्रमुख व परिसरातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभाग तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत बचत गटातील महिलांना प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात गावामधील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिलांना त्यांचा पायावर उभे राहण्यासाठी 5 हजार महिलांना केळी,भाजीपाला सुकविण्यासाठी सोलर मशीन देण्यात येणार आहे. या सोलर मशीनच्या माध्यमातून केळी, तसेच वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला सुकवून प्रक्रियायुक्त पदार्थ आदिवासी विकास विभाग खरेदी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व बचत गटांनी एकत्र येऊन एक बचत गट स्थापन करावा जेणेकरुन या एकत्र बचत गटांना औजारे बँक स्थापन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अनुदान देण्यात येईल. येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत शेळी व गावठी कोंबड्या देण्याची योजना शासनामार्फत तयार करण्यात येत असून त्यांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे. तसेच कापुस, मका, तुर यांच्या टाकाऊ काड्यांपासून टोकळे तयार करण्याचे मशीन देणार असून ते टोकळेही आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करण्यात येईल. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळाबरोबरच मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भगवान बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून येत्या काळात गाव, पाड्यात जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात येणार असून ज्या ठिकाणी वीज नाही अशा ठिकाणी वीजेची व्यवस्था करण्यात येईल. तसेच ज्या नागरिकांना पक्के घर नाहीत त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बचत गटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी महिला बचतगटांच्या स्टॉलला भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नरेद्र पाटील, गटविकास अधिकारी सोनवणे यांनी केले तर उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक रामचंद्र पाटील यांनी सुत्रसंचलन केले.