धुळ्यात राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा
धुळे : क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे व खेळासाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, धुळे व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धाचा शुभारंभ आज गरुड मैदान, धुळे येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभागाचे उपसंचालक रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, रेखा पाटील, महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएनशनचे उपाध्यक्ष दिलीप जैसवाल, श्री. पिंपळादेवी शैक्षणिक सांस्कृतिकचे अध्यक्ष विनायक बापुजी शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.व्ही.पाटील, महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक शामजी देशमुख, धुळे जिल्हा हौशी नेटबॉल संघटनेचे सचिव योगेश वाघ, संघटना पदाधिकारी हेमंत भदाणे, गुरुदत्त चव्हाण, जगदीश चौधरी यांच्यासह क्रीडा विभागाचे कर्मचारी व आठ विभागातील खेळाडू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.गोयल म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये खेळाचे महत्व खूप आहे. विविध खेळाच्या माध्यमातून देशाच्या विकासात हेल्दी इंडिया आणि फिट इंडिया संकल्पनेत खेळाचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच राज्य शासनामार्फत 90 पेक्षा जास्त विविध खेळ प्रकाराच्या देश, राज्य व जिल्हा पातळीवर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आणि या खेळांत निवड झालेल्या खेळांडूना राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व मिळवून खेळामध्ये नावलौकिक मिळविता येते. नुकत्याच झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अनेक खेळाडूंनी विविध खेळामध्ये प्राविण्य मिळविले आहे. एवढेच नाही तर या आशियायी क्रीडा स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला. यातही दिव्यांग खेळाडूंनी 111 पदके प्राप्त केली असून आजपर्यतचा सर्वोच्च रेकॉर्ड होता. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचेही खेळाडू होते. त्यामुळे या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या खेळाडूनी सहभाग घेतला त्यांचा मला अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सुद्धा धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना विविध सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत जास्तीत खेळाडूंनी चांगले खेळून राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदरच्या स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये 14,17 वर्ष वयोगटातील राज्यातून 575 खेळाडू, 50 पंच, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पंच असे एकूण 625 जण सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई व यजमान नाशिक सह एकूण आठ विभाग सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून व विविध जिल्ह्यातून निवड चाचणीसाठी उपस्थित असलेल्या खेळाडूंमधून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरीता शासनाकडून गठीत केलेल्या निवड समितीमार्फत महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी यावेळी दिली.
यावेळी क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक श्री.रविंद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सर्व विभागातील खेळाडूंनी व पोलीस बँड पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू व मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या क्रीडा स्पर्धेचे उद्धटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सेवानिवृत्त प्राध्यापक एस.डी.बाविस्कर यांनी केले. यावेळी निवड समिती सदस्य मिनेश महाजन, जगदीश अंचन, शालीनी जयस्वाल, शाम देशमूख, विनय जाधव, सुशांत सुर्यवंशी, महेंद्र गावडे, शितल वाघ यांच्यासह खेळाडू, नागरिक व क्रीडा विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा