पीआय हेमंत पाटील यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, विनयभंगाचा गुन्हा दाखल
पोलिसांचे आवाहन : कोणीही मुलगी अगर महिला यांनी कोणाचीही भीती अगर भय न बाळगता त्यांच्याविरुद्ध झालेला अन्याय व अत्याचाराच्या घटनेची तक्रार दाखल करावी. महिलांविरुद्धचे अन्याय व अत्याचाराच्या घटनेमध्ये आरोपी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. – संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक, धुळे
धुळे : एका महिलेला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे केल्याप्रकरणी येथील धुळे क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा पोलीस दलातील क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच हेमंत पाटील यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या आठवडाभरापासून धुळे शहरासह जिल्ह्यात आणि राज्यातील पोलीस वर्तुळामध्ये या व्हिडिओविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क चढविले जात असतानाच या व्हिडिओशी संबंधित एका पीडित महिलेने तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या विरोधात देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर हेमंत पाटील यांना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. परंतु पोलिसांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत.
सदरचे प्रकरण घडल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे विनापरवानगी रजा टाकून निघून गेले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांना दिली. हेमंत पाटील यांच्या विरोधात धुळे शहरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात नीपक्षपातीपणे चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील (हल्ली नेमणूक नंदुरबार जिल्हा) यांनी सन 2022 पासून ते 11 नोव्हेंबर 2023 पावतो पीडित महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. अश्लील वक्तव्य करून मोबाईल व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करून पीडित महिलेस तिचे अंगावरील कपडे काढायला सांगितले. तसे केले नाही तर तुझी समाजात बदनामी करेल, अशा धमक्या दिल्या. तसेच वेळोवेळी व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करून, नग्न अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. हस्तमैथुन करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुझे मरण नक्की जवळ आले आहे, अशा धमक्या आरोपी व त्याच्या साथीदारांनी फोनद्वारे दिल्या.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध तसेच त्यांच्या सह आरोपी यांनी पीडित महिलेला वेळोवेळी फोन करून धमकावले म्हणून 11 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 2023/भादंवी कलम 354 (अ), 354(ब), 354 (ड), 509, 506, 34 सह आयटी ॲक्ट 67 व 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, धुळे शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशन यांची संयुक्त पथके रवाना करण्यात आली आहेत. सदर प्रकरण संवेदनशील असून, त्याचा सखोल तपास चालू आहे, असे पोलिसांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Update : या प्रकरणात पीडित महिलेने न्यायालयात दिलेल्या जबाबानुसार 376 A हे वाढीव कलम लावत पीआय हेमंत पाटील यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. धुळे पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले आहे.