राष्ट्रवादीच्या नेत्याला मारण्यासाठी पन्नास लाखांची सुपारी
धुळे : बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आणि या आरोपात निलंबित झालेले धुळे क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह त्यांच्या हस्तकांनी मला मारण्यासाठी पन्नास लाखांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी तीन दिवसांपूर्वी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला.
एसपी संजय बारकुंड यांच्याशी मैत्रीचे भांडवल करू नये!
सारांश भावसार यांनी यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निलंबित पीआय हेमंत पाटील यांनी काही दिवसापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या नावाचा उल्लेख करीत माझी निरर्थक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक राजकीय, सामाजिक व व्यावसायिक जीवन जगत असताना संबंधित अधिकारी हेमंत पाटील यांच्याशी माझा सुईच्या टोका इतकाही संपर्क कधी झाला नाही. मात्र विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धुळे शहरातील अनेक व्यक्तींचा प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांशी संबंध येतो व या संबंधातून घनिष्ठ मैत्री देखील होते. अशाच पद्धतीने माझी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याशी मैत्री झाली. त्यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध जगाच्या पाठीवर मी कधीही नाकारणार नाही. पोलीस अधीक्षक बारकूंड हे माझे कालही मित्र होते, आजही मित्र आहेत आणि उद्याही राहणारच !
या मैत्रीचे भांडवल करून माझी धुळे शहरातील राजकीय वाटचाल कुणाला तरी पचली नसावी तसेच मागील काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या गंभीर प्रश्नावर मी घेतलेली भूमिका व माझ्या पक्षाची मांडलेली भूमिका या सर्व पार्श्वभूमीच्या माध्यमातून केवळ हेमंत पाटील यांचे कुकर्म झाकण्यासाठी कोणताही वस्तूस्थितीजन्य पुरावा नसताना माझी बदनामी करण्याचा बालिश प्रयत्न झालेला दिसून येतो.
हेमंत पाटील यांनी फरार न होता चौकशीला सामोरे जावे!
हेमंत पाटील यांनी विना पुरावा केलेल्या या आरोपांच्या बाबत मी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे व त्यांनी केलेल्या या दाव्यावर ते ठाम असतील तर त्यांनी प्रशासकीय पदावर काम केल्याची जाणीव ठेवून फरार न होता पोलीस प्रशासनाला सामोरे जाऊन त्यांच्या दाव्यानुसार संबंधित व्हिडिओ हा डिफेक्ट असेल त्या संदर्भात त्यांनी फॉरेन्सिक डॉक्युमेंट्स पोलीस प्रशासनाला द्यावेत. या संदर्भात त्यांनी संविधानिक मार्गाने कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असे मी त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो. या प्रकरणात मला धमकीचा फोन देखील आलेला आहे. तसेच मला मिळालेल्या धमकीत आपण हेमंत पाटील यांच्या प्रकरणात हस्तक्षेप न करता काढता पाय घ्यावा अन्यथा मला तुमचा बंदोबस्त करावा लागेल अशा आशयाची धमकी मला मिळालेली आहे. पोलीस दलातील कर्मचारी व हेमंत पाटील यांचा हस्तक श्रीकांत पाटील यांनी काही सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून मला गंभीर अशी शारीरिक इजा पोचवण्याच्या हेतूने समाजकारणात व राजकारणातून बेदखल करण्यासाठी सुपारी देखील दिल्याचे माझ्या निदर्शनास खाजगी माहितीद्वारे आलेले आहे.
खाकी वर्दीतील गुंडगिरीचा बंदोबस्त करा!
धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांच्या गणवेशातील सुरू असलेली दरोडेखोरी कुठेतरी माझ्या माध्यमातून बंद होताना दिसत असल्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीचे बेछूट आरोप करण्यात आल्याचे भासते. या प्रकरणात माझ्यावर झालेल्या खोट्या आरोपानंतर जिल्ह्यातील अनेक लोकांनी या चार ते पाच अधिकाऱ्यांमार्फत दाखल झालेले गतकाळातील खोट्या गुन्ह्यांची माहिती मला मिळालेली आहे. आपल्या पोलीस सेवेतील पदाचा उपयोग खोटे गुन्हे दाखल करण्याच्या माध्यमातून सरळ सरळ कायद्याच्या संरक्षणात राहून झालेली दरोडेखोरी संदर्भात माझ्याकडे ठोस पुरावे देखील आहेत. ते मी आपल्यासमोर मांडणार व सुपूर्द करणार आहे. बलात्काराच्या प्रकरणातील फरार आरोपी हेमंत पाटील यांनी C.R.No. 123/22 यामध्ये ट्रक चोरीचा गुन्हा दाखल करून यातील विविध आरोपींकडून एक कोटी 90 लाख रुपये बळकवले असल्याची माहिती मला मिळालेली आहे. यामध्ये योग्य वेळी आरटीओ विभागातील मोठे अधिकारी देखील पुढील काळात आपल्याला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे हेमंत पाटील यांनी त्यांच्या शासकीय सेवेमध्ये केलेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे अनेक परिवारांना मोठ्या प्रमाणात अन्यायाचा सामना करावा लागला आहे.
पीडितेला न्याय द्यावा!
बलात्काराच्या प्रकरणात पीडितेने स्वतः तक्रार दाखल करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी हा शासकीय सेवेवर रुजू असताना फरार होतोच कसा? हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे. हेमंत पाटील यांनी गंभीर गुन्ह्यात फरार होऊन अज्ञास्थळावरून असे बेछूट आरोप न करता कायद्याच्या चौकटीत न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे. अन्यथा पोलीस प्रशासनाने त्यांना अटक करून संबंधित पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करीत आहे.
नाशिक ग्रामीणचे पीआय हेमंत पाटील यांचाही संबंध :
बलात्काराच्या प्रकरणात फरार असलेले निलंबित अधिकारी हेमंत पाटील यांना पूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत सुभाष पाटील यांनी घेतलेली दिसून येते. हेमंत सुभाष पाटील यांच्यावर देखील अतीशय गंभीर स्वरूपाचे आरोप असताना गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या फिर्यादींना पोलीस प्रशासनाकडून योग्य वागणूक दिली गेलेली नाही. हेमंत सुभाष पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह रवींद्र देशमुख, प्रतीक महाले, नंदू सोनवणे, महेंद्र पाटील व सुनंदा भामरे यांच्याविरुद्ध पोस्को सारखा खोटा गुन्हा नोंदविण्याचे महापाप धुळे जिल्हा अजून विसरलेला नाही. सदरील प्रकरणात उच्च न्यायालयाने अतीशय गंभीर ताशेरे हेमंत सुभाष पाटील यांच्या विरोधात ओढलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या मते हेमंत सुभाष पाटील यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्याव्यतिरिक्त राजकारणात जास्त रस असल्याने मूळ गुन्हा सोडून केवळ राजकीय हेतूने देशमुख परिवाराविरोधात खोटी तक्रार नोंदवून घेतली असल्याचे स्पष्टपणे नोंदविले आहे. तसेच दोंडाईचा येथील माजी नगरसेवक रामराख्या गिरधारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार बंडू कुलकर्णी, हेमंत पाटील व त्यांचे अन्य साथीदार यांनी प्रतीक महाले यांच्याद्वारे त्याच्या जिविताला धोका निर्माण करण्याची धमकी देऊन त्यांच्या परिवाराकडून 42 लाख रुपयांची खंडणी घेतलेली आहे. या संदर्भातील व्हिडिओ, लेखी तक्रार देखील मी आपणांसमोर सादर करणार आहे.
हेमंत देशमुख यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढा उभारणार!
85 वर्षीय वयोवृध्द ज्येष्ठ नेते हेमंतराव देशमुख यांच्या विरोधात पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा नोंदविलेला गुन्हा हा समाजातील कोणत्याही स्तरावर जगणाऱ्या सामान्य नागरिकाला पटणारा नाही. तसेच ठाकूर नावाच्या अधिकाऱ्यावर केलेली बेकायदेशीर कारवाई केवळ पैसे उकळण्याच्या हेतूनेच होती हे देखील निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अशा अनेक प्रकरणातील पुरावे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी या भूमिकेतून पुढील काळात मोठा लढा देखील उभा करणार असल्याचे सारांश भावसार यांनी स्पष्ट केले आहे.
दोन बायका अन् तीन अपत्यांचे गौडबंगाल!
पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय नियमांचा भंग केल्याबाबत नामदेव रामभाऊ खैरनार (रा. नाशिक) यांनी देखील तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दोन लग्न केलेले असून, पहिली पत्नी वैशाली उर्फ तनुजा हेमंत पाटील या हयात असताना व त्यांचे सोबत कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना हेमंत पाटील यांनी 2004 साली श्रीमती भावना पाटील सुर्वे यांच्यासोबत दुसरा विवाह केला आहे. त्यानंतर पहिल्या पत्नीस सन 2013 रोजी दोघांच्या संमतीने 21 लाख रुपये रोख देऊन कोर्टात घटस्फोट घेतला आहे. हेमंत सुभाष पाटील यांना कायदेशीर बाबींची पूर्वकल्पना असूनही त्यांनी पहिली पत्नी हयात असताना त्यांना कायदेशीर घटस्फोट न देता कायद्याचे रक्षक असूनही कायद्याचे उलंघन केले आहे. शासनाने सन 2005 रोजी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता दोनच अपत्याचा नियम अमलात आणला आहे. परंतु हेमंत पाटील यांनी सन 2004 रोजी शासनाची दिशाभूल करून दुसऱ्या पत्नीस तीन अपत्ये झाले ही बाब हेतूपूर्वक शासनापासून लपवून ठेवली असल्याने नियमाचा भंग झालेला आहे. तसेच सन 2013 रोजी कायदेशीर घटस्फोट घेण्यापूर्वी दुसरा विवाह करून तीन अपत्य जन्मास असून सुद्धा शासकीय अधिकाराचा दुरुपयोग करून शासकीय सेवेत जबाबदार अधिकारी म्हणून कर्तव्य करीत आहे. नियमांची पायमल्ली करून घटस्फोट न घेता दुसरा विवाह करून सन 2005 रोजी नंतर तीन अपत्य जन्मास घालून शासकीय नियमांची पायमल्ली केली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना तीन अपत्य असल्याबाबतचे कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्याची छायांकित प्रत, फारकतीची कागदपत्रे संकलनाची छायाचित्र आपल्या माहितीस्तव जोडत आहोत.
प्रशासकीय सेवेतील गुंडांच्या विरोधात भुमिकेमुळे मला धोका
प्रशासकीय सेवेतील गुंडांच्या विरोधात मी घेतलेल्या या भूमिकेमुळे नक्कीच माझ्या जीविताला या सर्व पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून धोका निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वच नामवंत व्यक्तिमत्त्वांनी मला फोन करून आधार देत आगामी काळात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता असल्याने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
हेही वाचा