मराठा समाजाची बुलंद तोफ मनोज जरांगे पाटील ३ डिसेंबरला धुळ्यात
धुळे : मराठा समाजाची बुलंद तोफ मनोज जरांगे पाटील सध्या समाज एकत्रीकरणासाठी संपुर्ण महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. धुळे जिल्ह्यात देखील आरक्षणाची मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला उभारी देण्यासह कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील ३ डिसेबंर रोजी धुळे शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात जाहिर सभा भगतसिंग चौक, फाशीपुल या प्रस्तावित ठिकाणी होणार आहे.
या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने युध्द पातळीवर तयारी सुरु झाली आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आता अंतीम टप्यावर आलेली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सऱ्हाटी येथुन मनोज जरांगे पाटील या लढवय्या तरुणाने संपुर्ण समाजात आरक्षणाच्या मागणीची ज्योत प्रज्वलीत केली आहे. आता हक्काच्या मागणीसाठी संपुर्ण समाज देखील पेटुन उठला आहे. समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाला अधिक सक्षम करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे संपुर्ण राज्यभरात दौरा करत आहेत. त्यांचे विचार जिल्ह्यातील जनमाणसापर्यंत पोहचावे या उद्देशाने जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांना या वेळी जिल्ह्यात येण्याचे निमंत्रण दिले. मनोज जरांगे पाटील यांनी धुळे जिल्ह्यात येण्यास होकार दर्शवला. मनोज जरांगे पाटील हे ३ डिसेंबर रोजी शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात दुपारी १ वाजेला फाशीपुल भगतसिंग चौकात भव्य जाहिर सभा आयोजीत करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आता राज्यात नव्हे तर देशभर ओळख आहे. सध्या राज्यभरात ते जेथे जात आहेत, त्या ठिकाणी भव्य स्वागत होत आहे. त्याच तोलामोलाचे स्वागत आणि सभा धुळे शहरात देखील करण्याचे नियोजन सकल मराठा समाजाने केलेले आहे. पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील शहरात येत असल्याने शहरासह जिल्हाभरातुन किमान एक लाख समाजबांधवाची विशेष करून मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती राहणार आहे.
मोठ्या प्रमाणात समाज एकत्र येणार असल्यामुळे कोणतीच गैरसाेय होऊ नये या उद्देशाने ठोस नियोजन करण्यात येत आहे. या नियोजनासाठी समाजाच्या १०० समाज बांधवांची एक कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कोअर कमिटीत समाजातील विविध संघटनांचे सर्व सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. नियोजन अचुक होण्यासाठी अनेक विभाग व जबाबदारी वाटप करण्यात येत आहे. या सभेसाठी आर्थिक भार हा कोअर कमिटी स्वत: उचलणार आहे.
या सभेस सर्व समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
पञकार परिषदेस मराठा समाजाचे समन्वयक भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, निंबा मराठे, विनोद जगताप, दिपक रौंदळ, कैलास मराठे, संदिप पाटोळे, दिनेश काळे, भैय्या शिंदे, मनोज ढवळे, सुनील ठाणगे, वामन मौहीते, गोविंद वाघ, शाम निरगुडे, आदी कोर कमिटी सदस्य उपस्थित होते.