सातपायरी धरणात पाणी टाकण्यासाठी सर्व्हे अहवाल सादर करा : आ. कुणाल पाटील यांच्या सूचना
धुळे : तालुक्यातील बुरझड परिसरातील सातपायरी धरणात अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी टाकण्यासाठी सर्व्हेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांना त्वरीत सादर करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पाटबंधारे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील यांना दिल्या. तर मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न केले जातील, अशी माहिती आ. पाटील यांनी जलसंघर्ष समिती बुरझड परिसरच्या पदाधिकार्यांना तसेच ग्रामपंचायत पदाधिकार्यांना दिली. दरम्यान सातपायरी लघु प्रकल्पासाठी 5 टक्के पिण्याचे पाणी राखीव करण्याचीही मागणी यावेळी जलसंघर्ष समितीने केली.
धुळे तालुक्यासह जिल्हयात दुष्काळ आहे. परिणामी धुळे तालुक्यातील बुरझड येथील सातपायरी लघु प्रकल्प कोरडाठाक झाला आहे. म्हणून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सातपायरी धरणात अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यातून मौजे निमडाळे जवळून सातपायरी धरणापर्यंत पाटचारी तयार करुन सदर धरण भरण्यात यावे अशी मागणी बुरझड, नंदाणे, वडणे, सायने येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. त्या अनुषंगाने जलसंघर्ष समिती बुरझड परिसर आणि या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकर्यांनी आ. कुणाल पाटील यांची भेट घेतली. यावेळी समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सातपायरी धरण भरण्यात यावे. तसेच या लघु प्रकल्पासाठी 5 टक्के पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी जलसंघर्ष समितीने निवेदनातून केली. याप्रसंगी आ. कुणाल पाटील यांनी पाटबंधारे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन सातपायरी धरण भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हेक्षण ताबडतोब करा आणि सदरचा सर्व्हे अहवाल तत्काळ जिल्हाधिकार्यांना सादर करावा अशा सूचना दिल्या.
दरम्यान, अक्कलपाडा प्रकल्पातून सातपायरी धरणात पाणी टाकण्यासाठी व पिण्याचे पाणी राखीव करण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आ. पाटील यांनी जलसंघर्ष समितीच्या पदाधिकार्यांना सांगितले.
याप्रसंगी जलसंघर्ष समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सचिव ज्ञानेश्वर पाटील, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, नंदाणे माजी सरपंच माधवराव पाटील, बाजार समितीचे संचालक एन. डी. पाटील, बुरझड सरपंच संतोष पाटील, संदिप मगन पाटील, नंदाणे सरपंच रविंद्र पाटील, नितीन शंकर पाटील, हिरामण पाटील, अतुल शिरसाठ, रामचंद्र पाटील, बारकु पाटील, समाधान पाटील, साहेबराव पाटील, महेंद्र पाटील, नाना माळी, सुभाष माळी, रोहिदास पाटील, बापू पाटील, अनिल पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्र महाले, अशोक नागमल, नितीन पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.