साक्री तालुक्यात पत्नीचा विनयभंग करत पतीवर तलवारीने प्राणघातक हल्ला
धुळे : साक्री तालुक्यातील छाईल येथील विवाहितेचा विनयभंग केल्यानंतर तीच्या पतीवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या पतीला सात जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला वारंवार जाऊनही फिर्याद दाखल न करता परत पाठवून दिले. न्याय मिळत नसल्याने धुळ्यात पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम आणि पीडित महिलेच्या सासुने सांगितले की, साक्री तालुक्यातील छाईल गावात पोल्ट्री फार्ममधील घरात अनिल लोटन जाधव याने चोवीस वर्षीय विवाहितेचा 14 नोव्हेंबर रोजी विनयभंग केला. तसेच पती पंकज बर्डे यांच्यावर 16 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. गावातील अनील लोटन जाधव, सुनील लोटन जाधव, गणेश दीपक जाधव, दीपक शांताराम जाधव, प्रतिक सतिष कुवर, प्रविण छोटू मोरे, निलेश बोधु कुवर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. अनिल जाधव याने पंकज बर्डेच्या डोक्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत हात फ्रॅक्चर झाला. पंकज बर्डेंना सोडविण्यासाठी आलेल्या चेतन थोरात यांनाही मारहाण करण्यात आली.
दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला नेले असता त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे सांगितले. साक्री येथून धुळ्यातील सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असता आठ ते नऊ टाके पडले. साक्री पोलीस स्टेशन येथे तीन वेळा जाऊनही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली. याउलट पोलीसांनी पीडित विवाहितेचा पती पंकज बर्डे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला, गंभीर जखमीची फिर्याद नोंदविण्यात पोलीस टाळाटाळ का करत आहेत? मारहाण करणार्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पोलीस राजकीय दबावाखाली येऊन आरोपींची नावे कमी करा, जातीवाचक शिवीगाळ काढून टाका असा दबाव आणत असून फिर्याद दाखल करून घेत नाहीत. तसेच तक्रार अर्जाची प्रत साक्री पोलीस स्टेशनसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला आबा खैरनार, अरविंद निकम, शंकर खरात, सिताराम वाघ, दिलीप बोरसे, चंद्रमणी वाघ, रत्ना बर्डे, दिलीप बर्डे उपस्थित होते.