महामार्गावर लुटमार करणाऱ्या सात जणांच्या राॅबरी गॅंगला पकडले
धुळे : पिस्तूल रोखून रस्तालुट करणाऱ्या राॅबरी गॅंगचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून, टोळीतील सात जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाला आहे. कापूस व्यापाऱ्यांकडून लुटलेल्या सात लाखांपैकी पावणेतीन लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर कापूस व्यापाऱ्याला मारहाण करत सात लाख रुपये लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने शिताफीने अटक केली. गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धुळे शहरातून आर्वी येथे रोकड घेऊन जाणारा कापूस व्यापारी हितेश शंकर पाटील व त्याच्या मित्राला मागून येणाऱ्या चार दुचाकीस्वारांनी त्यांची दुचाकी अडवत बेदम मारहाण करून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमधील सात लाख रुपये हिसकावून पोबारा केला होता.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह शोध पथकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांच्या टोळीचा शोध सुरू केला. यासंदर्भात कापूस व्यापारी हितेश पाटील याच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यां दोघांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
यावरून उज्जैन गायकवाड (रा. जुन्नेर, ता. धुळे), दादू सोनवणे (रा. मोरशेवडी, ता. धुळे), राहुल सूर्यवंशी (रा. चितोड, ता. धुळे), गोकुळ अहिरे (रा. चितोड), बादल मोरे (रा. बल्हाणे, ता. धुळे), अनिल सोनवणे (रा. दिवाणमळा, ता. धुळे), प्रकाश सोनवणे (रा. दिवाणमळा) अशा सात संशयितांना अटक केली. लुटलेल्या रकमेपैकी दोन लाख ६१ हजार १०० रुपये रोकडसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी, एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुस, तसेच फिर्यादी व आरोपी याच्याजवळील मोबाईल असा एकूण पाच लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.