धुळ्यात मालमत्ता कराचे लाखोंचे गौडबंगाल उघड
आधी 55 हजार घरपट्टी होती, आता साडेचार लाख आहे, बाळापूरच्या व्यावसायिकाला 27 लाख रुपये भरण्याची नोटीस
धुळे : राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांच्या तुलनेत धुळे महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे दर सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे धुळे महानगरप्रमुख संजय गुजराथी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत उघड केली. राज्यातील इतर महापालिका आणि धुळे महानगरपालिका यांच्यासाठी राज्य सरकारचे नियम वेगवेगळे आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. धुळे पालिका प्रशासनाकडून मालमत्ता कराच्या रूपाने होणारी धुळेकरांची लुट थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय गुजराथी म्हणाले की, अवाजवी मालमत्ता कर भरण्यासाठी जनतेने आपल्या मालमत्ता खाजगी सावकाराकडे गहान ठेवायच्या का? मालमत्ता करासंदर्भात आणि कर आकारणी संदर्भात कोणतेही तांत्रिक ज्ञान नसलेल्या ठेकेदाराचा ठेका महापालिकेने रद्द करावा, महापौरांनी महासभा घेवून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार झोनचे दर आणि मालमत्ता कराचे दर ठरवून मालमत्ता कराच्या नोटीस नव्याने जनतेला द्याव्यात, अशी मागणी गुजराथी यांनी केली.
मनपा प्रशासनाने सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून नियमबाह्यपणे धुळेकरांवर मालमत्ता कर लावला आहे. एकही सुविधा नियमितपणे न देवू शकणार्या धुळे मनपाने मालमत्ता करासंदर्भात राज्यात इतिहास रचला आहे. राज्यातील अ ते ड वर्ग मनपा आणि धुळे मनपाच्या मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मनपा प्रशासन धुळेकर जनतेला मुर्ख समजून आपली तिजोरी भरण्याचे काम करत आहे. नियम धाब्यावर बसविणारी मनपा राज्याबाहेर आहे का? असा सवालही संजय गुजराथी यांनी विचारला आहे. मालमत्ता कर आकारणीच्या ठेक्याचे काम एका वर्षात पूर्ण होवू शकते. असे असताना पाच वर्षांसाठी 10 कोटी रुपयांचा ठेका दिलाच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
घरपट्टी 55 हजारांवरून चक्क साडेचार लाखांवर : शहरारालगत असलेल्या एका स्टाईल्स व्यावसायिकाला 55 हजार मालमत्ता कर होता. आता तो साडेचार लाख रुपये करण्यात आला आहे. करापोटी तब्बल 27 लाखांची नोटीस मनपाने त्यांना पाठविली आहे. देवपुरातील एका मालमत्ता धारकाला 2500 रुपये कर होता. त्याला आता 52 हजार रुपयांची कर आकारणी झाली आहे. कर आकारणीने धुळ्यातील मालमत्ताधारक हवालदील झाले आहेत.
ठेका दोन वर्षापुर्वी दिला गेला. परंतु त्या आधीपासूनची बिले दिली जात आहेत. महापालिकेत 31 डिसेंबरपर्यंत भाजपाची सत्ता आहे. महापौर चांगले का करत आहेत. त्यांनी महासभा घेवून ठराव करावा आणि धुळेकरांची आर्थिक अत्याचारातून सुटका करावी, असे आवाहनही त्यांनी हापौरांना केले आहे. आधी कर वाढवायचा आाणि त्यानंतर सुनावणीचे नाटक करायचे. सुनावणीसाठी सक्षम अधिकारी पाहिजे. परंतु त्या ऐवजी एखाद्या लिपिकालाच बसविले जाते. मालमत्ता कर प्रकरणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून धुळेकर जनतेवरील अन्याय दुर करणार असेही संजय गुजराथी म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबतविजय अग्रवाल, शिकारे आदी उपस्थित होते.
अगोदरच एकही नागरी मुलभुत सेवा धुळे मनपा देवू शकत नाही त्यात कर वाढवत आहे धुळे मनपा वर ग्राहक सेवा कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त
प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे करदात्या धुळेकर नागरिकांनी दाखल करावेत यात धुळे मनपा प्रशासन आणि धुळे मनपा नगरसेवक आदी ना आरोपी म्हणून कायदाच्या पिंजऱ्यात उभे करावे