आझाद समाज पार्टीतर्फे रास्तारोको आंदोलन
धुळे : साक्री तालुक्यातील विटाई गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तत्काळ प्रशासकीया मान्यता द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी आझाद समाज पार्टीतर्फे शहरातील शिवतीर्थ चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आनंद लोंढे यांना अटक : रास्तारोको आंदोलनामुळे शिवतीर्थ चौकाच्या परिघात काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
प्रशासनाला दिले निवेदन : आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विटाई ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आहेत प्रमुख मागण्या : त्यानुसार विटाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशासकीया मान्यता द्यावी, विटाई गावातील वनजमीन अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, विटाई गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मंजूर झालेल्या जागेलगत असलेली मुतारी योग्य ठिकाणी हलवावी. तसेच धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थानकजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील वाईन्स शॉप त्वरीत स्थलांतरीत करावे, अशा तीन मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
… तर आमरण उपोषण करणार : 14 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून विटाई ग्रामस्थ व आंबेडकरी समुदायाचे विविध पक्ष-संघटनाचे पदाधिकारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार, असा इशाराही देण्यात आला.
रास्तारोको आंदोलनात आनंद लोंढे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आबा अृतसागर, मुकुंदराव शिरसाठ, समाधान झाल्टे, कुलभुषण वाघ, महेंद्र सोनवणे व ग्रामस्थ सहभागी झाले होते.