धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 50 हजार चोरले
धुळे : मुलीच्या लग्नासाठी म्हैस विक्री केल्यानंतर मिळालेले 50 हजार रूपये पाकिटमाराने चोरल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असताना आझादनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
मुलीच्या लग्नासाठी म्हैस विकली : जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील हिवरखेडे गावातील शेतकरी अर्जुन भिका जोगी यांच्या मुलीचे लग्न आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून त्यांनी म्हैस विक्रीला काढली. 5 डिसेंबरला मंगळवारी धुळ्याचा बाजार असल्याने ते म्हैस घेऊन धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आले. गुरांच्या बाजारात त्यांनी म्हैस विक्री केली. मिळालेल्या 65 हजार रुपयांपैकी त्यांनी 50 हजारांचा बंडल एका खिशात ठेवला तर दुसऱ्या खिशात 15 हजार रुपये ठेवले.
अशी झाली चोरी : अर्जुन जोगी हे शेतकरी म्हैस विक्रीचे पैसे खिशात ठेऊन गुरांच्या बाजारातून बाहेर येत असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. त्याचवेळी मागून येणाऱ्या अन्य अनोळखी पाकिटमाराने खिशातून 50 हजार चोरले आणि तो पसार झाला.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद : पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित शेतकऱ्याने शोधाशोध सुरु केली. व्यापाऱ्यांच्या दुकानांबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर दोन कॅमेरांमध्ये चोरीची घटना रेकाॅर्ड झाली होती.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ : सीसीटीव्ही फुटेज घेऊन शेतकऱ्याने आझादनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु पोलिसांनी त्यांची चोरीची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याऐवजी पैसे गहाळ झाल्याचा अर्ज लिहून आणण्यास सांगितले. पोलिसांनी कोणतीही मदत केली नसल्याचे या शेतकऱ्याने आणि त्यांच्या मित्रांनी सांगितले. याबाबत आपण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.