शिरपूर पोलिसांनी पकडली पंजाबची 50 लाखांची दारू
धुळे : शिरपूर शहर पोलिसांनी पंजाबची 50 लाख रुपयांचा दारुसाठा सोमवारी रात्री 11 वाजता पाठलाग करुन पकडला. पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयशरसह सुमारे 79 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आर. जे. 19 जे. एच. 8482 क्रमांकाचे आयशर वाहन मध्यप्रदेशातील सेेंधवा येथून राज्यात बोराडी, वाडीमार्गे अवैध दारु घेवून येत असल्याची गुप्त माहिती ए. एस. आगरकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला डी. बी. पथकासह वाडी येथे पाठविले. या पथकाने सापळा रचला. रात्री 11.15 वाजेच्या सुमारास आयशर गाडी बोराडीकडून वाडीकडे येताना दिसली. पोलिसांना पाहुन आयशर चालकाने गाडी पळविली. पोलिसांनी पाठलाग करून गाडी थांबविली. आयशर चालक अंधाराचा गैरफायदा घेत पसार झाला.
आयशरची पाहणी केली असता, पंजाब राज्यात विक्रीसाठीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. 49 लाख 21 हजार 180 रुपये किमतीची रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, नंबर वन अशा कंपनीची विदेशी दारु आणि 30 लाख रुपये किंतीचे आयशर वाहन असा 79 लाख 21 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात या मद्यसाठाचा मालक, खरेदीदार, पुरवठादार आणि वाहन चालाकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, गणेश कुटे, डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल ललीत पाटील, प्रेमसिंग गिरासे, रवींद्र आखडमल, प्रमोद ईशी, योगेश दाभाडे, गोाविंद काळे, विनोद आखडमल, भटू साळूंखे, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, दीपक खैरनार, विवेकानंद जाधव, भुपेश गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी, सुशिलकुार गांगुर्डे, शांतीलाल पवार, रवींद्र महाले, गृहरक्षक दलाचे, मिथून पवार, शरद पारधी, चेतन भावसार यांच्या पथकाने केली.
हेही वाचा