तरवाडे उड्डाणपूलासाठी ना. गडकरींना भेटणार : आ. कुणाल पाटील
धुळे : उड्डाण पुलाअभावी तरवाडेसह मोरदडतांडा,सिताणे,नाणे,नंदाळे या परिसरातील प्रवास धोकेदायक झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील तरवाडे गावाजवळ उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार आहे. त्याकरीता तत्काळ उड्डाणपूलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, जळगाव यांना दिल्या.
दरम्यान, शिरुड, मुकटीसह राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि क्र.211 लगत असलेल्या धुळे तालुक्यातील गावामधील शेतकरी,स्थानिक रहिवाशी आणि वाहनधारकांच्या या महामार्गामुळे उद्भवलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, जळगाव आणि धुळे येथील अधिकार्यांची बैठक घेण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 आणि क्र. 6 हे दोनही महामार्ग धुळे तालुक्यातून जातात. धुळे सोलापूर महामागाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे तसेच तसेच सुरत नागपूर या महामार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे. या दोनही मार्गाचे काम करीत असतांना महामार्गावरलगत येणार्या गावातील रहिवाशी,शेतकरी आणि वाहनधारकांच्या दैनंदिन दळणवळणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरीकांमध्ये अपघाताची भिती निर्माण झाली असून रात्री अपरात्री प्रवास करणेही धोकेदायक झाले आहे. त्यामुळे उद्वभवलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच धुळे येथील संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बैठकिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक धुळेचे अजय यादव, अभियंता दिग्वीजय पाटील, कॉक्ट्रक्टर अरुण सोनवणे उपस्थित होते. बैठकीत तरवाडे येथील उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी तरवाडे गावाजवळ उड्डाण पूलाची मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 तरवाडे ता.धुळे गावावरुन जातो. या महामार्गामुळे तरवाडे गाव दोन भागात विभागले गेले आहे. उड्डाणपूल नसल्याने येथील शाळकरी विद्यार्थी,शेतकरी यांचा जीव धोक्यात आला आहे. तसेच मोरदडतांडा,सिताणे,नाणे,नंदाळे या गावांना तरवाडे येथून एकमेकांचे दैनंदिन संबध येत असतात. तसेच शेती कामासाठीही महामार्ग क्र. 211 वरुन जावे लागते. परिणामी उड्डाणपूल नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून या परिसरातील नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. म्हणून तरवाडे गावाजवळ उड्डाणपूल करण्यासाठी लवकच केंद्रीय रस्ते वाहतून व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेणार असून उड्डाणपूलाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या.
दरम्यान, शिरुड ता. धुळे चौफुलीजवळ असलेल्या वहीवाटची पाटचारी आणि जत्रा हॉटेलशेजारी असलेली पाटचारी महामार्गाचे काम करीत असतांना बुजली गेली आहे,त्यामुळे सदर पाटचार्यात पाईप टाकून पुन्हा तयार करुन देण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिल्या. अनेकवेळा महामार्गावरील पाणी शेतकर्यांच्या शेतात जाते, त्यामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होत असते म्हणून पावसाळ्यात पडणारे महामार्गावरील व आजूबाजूच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, शिरुड चौफूली ते विंचूर फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील प्रलंबित कामांबाबतही बैठकीत चर्चा झाली.मुकटी ता. धुळे गावाजवळ महामार्गावर तीन जक्शन आहेत. मात्र या ठिकाणी लाईट,बसथांबा तसेच इतर सुविधा नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करतांना प्रवाशांना भिती वाटते. या ठिकाणी लाईट व्यवस्थेसह सर्व्हिस रोड तयार करणे, मुकटी गावाकडे जाणारा जुना महामार्गाचे नुतनीकरण करुन पथदिवे बसवावेत. अंचाळे रस्त्यावरील जक्शनला पथदिवे व इतर सुविधा करणे,काळखेडे रस्त्यावर अंडरपास तयार करणे, नंदाळे फाट्यावर बसथांबा बसविणे, तसेच प्रत्येक गावाजवळ त्या त्या गावांचे नामफलक लावण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी बैठकित दिल्या.
बैठकीला बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, ज्येष्ठ नेते शिवाजी बोरसे, उपसभापती योगेश पाटील, संचालक एन. डी. पाटील, माजी पं. स. सदस्य पंढरीनाथ पाटील, आबा शिंदे शिरुड, बाजार समिती संचालक रावसाहेब पाटील, माजी संचालक माधवराव पाटील, नंदाळे सरपंच भाऊसाहेब पाटील, कुणाल पाटील, हर्षल साळुंके आदी उपस्थित होते.