राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ
धुळे : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) 2023-2024 अंतर्गत मार्गदर्शक सुचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना 55 टक्के व बहुभूधारक यांना 45 टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत अतिरिक्त 25 टक्के व 30 टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतक-यांना मंजूर मापदंडाच्या 90 टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
सन 2023-2024 मध्ये ‘अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांची योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी 1 डिसेंबर,2023 ते 31 डिसेंबर,2023 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याने या कालावधीत अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज भरतांना अचुक माहीती भरावी जेणेकरुन अर्ज रद्द होणार नाही. तरी जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक श्री वाघ यांनी केले आहे.
अर्जासोबत सातबारा, 8-अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उता-यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ.बाबत स्वयं घोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ 5 हेक्टर पर्यंत “देण्यात येईल. अर्जांची, महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झालेनंतर शेतक-यांना लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडुन संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होवुन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी यांनी सदर मोहीमेमध्ये सहभाग घेवून अर्ज नोंदणी करावी. सदर मोहिमेदरम्यान कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक प्रत्येक गावात मेळावे आयोजीत करुन योजनेची माहिती देणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी यांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व CSC केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, श्री. वाघ यांनी केले आहे.