राष्ट्रवादी भवन दोन्ही गटांसाठी खुले, सामंजस्याने वाद मिटला!
धुळे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या भवनाचा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर सामंजस्याने मिटला आहे. दोन्ही गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोन्ही कुलूपे उघडली असून, आता हे भवन दोन्ही गटासाठी खुले झाले आहे.
संघटनेचे मुख्य कार्यालय हे कोणत्याही पक्षीय क्षेत्रातील लहान मोठ्या प्रामाणिक कार्यकर्ताचे स्फुर्तीस्थान समजले जाते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा धुळे जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार व शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून गेल्या आठवड्यात धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भवन उघडण्यात आले.
कोणत्याही खाजगी कार्यालयापेक्षा धुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन हे जिल्हातील प्रत्यके कार्यकर्ताचे अस्मितेचे प्रतिक आहे. धोरणात्मक निर्णय सद्यस्थितीत वेगळे असले तरी याचा परिणाम सामाजिक हित व जबाबदारीचे विकेंद्रिकरणावर होऊ नये यासाठी दोन्ही गटाच्या प्रमुखांनी घेतलेली सामजंस्याची भुमिका चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे असताना धुळ्यात मात्र दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रवादी भवन दोन्ही गटांसाठी खुले करण्याचा निर्णय सामंजस्याने घेतला आहे. दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील राजकारणात चर्चा आहे.
धुळे शहरात गेल्या अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले राष्ट्रवादी भवन हे शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी राष्ट्रवादी भवन हे शरद पवार गटाचे असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी केला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी देखील या भावनाचे कुलूप तोडून राष्ट्रवादी काँग्रेस भावनावर ताबा मिळवला होता. दोन्ही गटांकडून कुलूप ठोकण्यात आले होते. यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. त्यामुळे आता हे भवन कोणाच्या ताब्यात जाते याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी सामंजस भूमिका घेत गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले राष्ट्रवादी भवन दोन्ही गटांसाठी खुले करण्याचा सामंजस्याने निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकीकडे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र राष्ट्रवादी भवन दोन्ही गटांनी एकमेकांसाठी खुले करून आपण एकत्रच असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही गटांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांवर याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
यावेळी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुमित पवार, शरद पवार गटाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष वाल्मीक मराठे, शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रईस रफुद्दीन काझी, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी विमुक्त जाती भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंत डोमाळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा