आदिवासी दुर्गम भागातील तरूण-तरूणींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
धुळे : आदिवासी दुर्गम भागातील तरूण-तरूणींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम धुळे जिल्हा पोलीस दलाने हाती घेतला आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनतर्फे सांगवी येथे पहिले प्रशिक्षण शिबीर झाले.
हिंसाचारग्रस्त सांगविला पोलिसांनी चांगला उपक्रम राबविल्याने पोलीस खात्याचे कौतुक होत आहे. काही महिन्यांपूर्वी सांगवीत झालेल्या हिंसाचारामुळे स्थानिक तरूण आणि पोलिसांमध्ये कटूता निर्माण झाली होती. पोलिसांच्या या उपक्रमामुळे सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होणार आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली ०९ डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यामध्ये आदिवासी भागातील होतकरु उमेदवार, भरतीपात्र युवक-युवतींनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. या शिबीरामध्ये पोलीस अधीक्षक यांनी तरुणांना करिअरच्या अनेक संधी असल्याबाबत तसेच अभ्यास कसा करावा? मैदानी सराव कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केले.
राऊळ भाऊसाहेब यांनी पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, पोलीस भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, शारिरीक चाचणी, त्यात उंची, छाती न फुगवता, छाती फुगवुन किती लागते, तसेच धरणग्रस्त, माजी सैनिक, महिला उमेदवार, खेळाडु यांच्यासाठी काय सवलती आहेत, बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलीस उपनिरीक्षक कोट्ळे यांनी लेखी परीक्षेतील अभ्यासक्रम, कोणकोणत्या विषयाला, घटकांना किती गूण आहेत, तसेच पोलीस भरती अभ्यासक्रम संदर्भात बाजारात कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत, अभ्यासाचे नियोजन कसे करावे? पेपरमध्ये कोणकोणत्या स्वरुपाचे प्रश्न येतात, अभ्यास कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केले.
राखीव पोलीस निरीक्षक माहुले यांनी मैदानी चाचणी कशी द्यावयची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी प्रात्यक्षीक देखील करुन दाखविले. भरती दरम्यान मैदानी चाचणी होत असताना सुचनांकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. सराव करत असताना कोणकोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, मैदानी परीक्षेच्या सरावादरम्यान कोणत्या प्रकाराचा आहार घ्यावा, व्यायाम कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशनच्या मैदानावर उमेदवारांना गटागटांमध्ये गोळा फेक, १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, १६०० मीटर धावण्याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.
धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रथमच आदिवासी भागामध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे पोलीस भरतीपूर्व शिबीर राबविले असून, या शिबिराचा भविष्यात शेकडो तरूण-तरूणींना निश्चीतच फायदा होणार आहे. भविष्यात देखील जिल्ह्यात अशा प्रकारचे शिबीर इतर आदिवासी दुर्गम भागात राबविण्याचा संकल्प पोलीस अधीक्षकांनी केला.
या शिबीराला पोलीस निरीक्षक आगरकर, राखीव पोलीस निरीक्षक माहुले, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सहायक पोलीस निराक्षक दीपक पावरा, पोलीस उपनिरीक्षक कोठुळे, शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे दुय्यम आधिकारी व पोलीस स्टाफ उपस्थित होते. शिबीराला पोलीस भरतीची तयारी करणारे युवक युवती व इतर ग्रामस्थ यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला.