महापौर प्रतिभाताई चौधरी, कैलास चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक
धुळे : शहरात देवपूरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्याचे 10 डिसेंबर रोजी लोकार्पण होते. परंतु दाखान्याच्या कोनशिलेवर माजी नगरसेवक कैलास चौधरी यांचे नाव नसल्याने तसेच त्यांना लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण न दिल्याने कार्यक्रमस्थळी वाद झाला.
काय आहे नेमकं प्रकरण : हा दवाखाना सुरू व्हावा यासाठी आपत्तीच्या काळात माजी नगरसेवक कैलास चौधरी यांनी पाठपुरावा केला होता. महासभेत ठराव करताना सूचक म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु फलक अनावरण प्रसंगी फलकावर त्यांचे नाव नसल्याने संतप्त झालेल्या कैलास चौधरी यांनी स्वतः फित कापण्याचा प्रयत्न केला. पण महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी त्यांना वेळीच अडविले. खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते फित कापली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कैलास चौधरी यांनी निषेध व्यक्त केला. तसेच लोकार्पण समारंभालाही विरोध केला. काही मिनिटे हा वाद सुरू होता.
दरम्यान, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी उपमहापौर तथा नगरसेवक नागसेन बोरसे यांनी मध्यस्थी केली. कैलास चौधरी यांचे नाव समाविष्ट करून नव्याने फलक लावण्याचे आश्वासन महापौर प्रतिभाताईंनी दिले. विशेष म्हणजे या दवाखान्याला राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्री स्व. राजमाता श्रीमंत पद्माराजे कदमबांडे यांचे नाव दिल्याने कार्यक्रमात वाद योग्य नसल्याची आठवणही नागसेन बोरसे यांनी करून दिली. त्यानंतर कैलास चौधरी यांनी सामंजस्याची भुमिका घेतली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.