धुळे शहरात घरात घुसलेल्या चोराचा तरूणावर चाकु हल्ला
धुळे : शहरातील पवन नगरात घरात घुसलेल्या चोरट्याशी तरूणाने दोन हात केले. त्यात चाकु हल्ल्यात तरूण जखमी झाला. त्यानंतर पसार होणार्या चोरट्याला परिसरात पेट्रोलिंग करणार्या चाळीसगाव रोड पोलिसातांनी पकडले. त्यांच्याकडून 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चाळीसगाव रोडवरील पवन नगरातील घर क्रं. 616 मध्ये गणेश जितेंद्र चौधरी (वय 24) हा तरूण राहतो. दि. 10 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास एका चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात अडीच हजारांचा टॅब, 17 हजारांचा मोबाईल, 15 हजाराचा मोबाईल चोरी करून घेवून जात असतांना गणेश यास जाग आली. त्याने चोरट्याशी दोन हात करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यादरम्यान चोरट्याने चाकुने गणेश याच्या उजव्या हाताच्या बोटावर वार करीत त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर गणेशने आरडोओरड केल्याने परिसरातील नागरिकही धावून आले. तसेच परिसरात पेट्रोलिंग करणार्या चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरट्याला पकडले. त्याल ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दानेश फारूख सैय्यद (रा. कल्लु स्टेडीअम, रहेमानपुरा, पहिली गल्ली, मालेगाव) असे चोरट्याने त्याचे नाव सांगितले. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालासह धारदार चाकु जप्त करण्यात आला.
याबाबत गणेश चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यावर चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय संदीप चौधरी करीत आहेत.
मद्यपी तरूणाचा हाॅटेलमध्ये धिंगाणा
साक्री : तालुक्यातील पिंपळनेर येथे नवापूर रस्त्यावरील काकसेवड शिवारातील हॉटेल बालाजी येथे दारू सेवन करून तर्र होवून धिंगाणा घालणार्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
गोटू पांडु देसाई (वय 30, रा. वाकी, पो.पानखेडा ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. तो दि. 9 रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धिंगाणा घालत हॉटेल मालक चुनिलाल पंडीत गावीत यांच्या अंगावर धावून शिवीगाळ करताना मिळून आला. त्याच्याविरोधात काॅन्स्टेबल सोमनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना सुर्यवंशी करीत आहेत.
दुचाकी अपघातात बाभुळवाडीचा तरूण ठार
धुळे : रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीने दुचाकीस्वाराचा जीव घेतला आहे. अंधाराचा अंदाज न आल्याने दुचाकीसह चारीत पडून दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री बाभुळवाडीनजीक झाला. नरेश झिपरू देसले (रा. बाभुळवाडी ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. तो एमएच 18 बीएन 9010 क्रमांकाच्या दुचाकीने दि. 9 रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास बाभुळवाडी गावाहून धुळ्याकडे येत होता. त्यादरम्यान बाभुळवाडीपासून एक किमी अंतरावर असलेल्या अग्नीदेवता मंदिराजवळ रस्त्यावर अंधार असलेल्या तसेच रस्त्याच्या उजव्या बाजुला खोदकाम केलेले साधारण पाच ते सात फुट खोल असलेल्या चारीत खड्डयात तोल जावून पडले. त्यात खडकाळ मुरूम, दगडांचा डोक्याला मार बसल्याने गंभीर जखमी झाले. त्यात ग्रामस्थांनी धुळ्यातील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत यशंवत झिपरू पाटील यांच्या फिर्यादीवरून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयतावर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पीएसआय राऊत करीत आहेत.
दोंडाईचात महिलेसह दोघांचे डोके फोडले
दोंडाईचा : येथील पिंपळा चौकात रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास वाद झाला. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून ज्योती गणेश पाटील (वय 34 रा. पिंपळा चौक) यांच्यासह एकास पाच जणांनी लाकडी दांडक्यांने मारहाण करीत डोके फोडून जखमी केले. तसेच हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याचीही धमकी दिली. याबाबत ज्योती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात लोटन यशंवत पाटील, राज लोटन पाटील, भावना लोटन पाटील, मयुरी लोटन पाटील, भाग्यश्री पाटील सर्व रा. पिंपळा चौक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय प्रदीप सोनवणे पुढील तपास करीत आहे.
साक्री तालुक्यात नऊ जणांना रंगेहात पकडले
निजामपूर : साक्री तालुक्यातील छडवेल-आमखेल रस्त्यालगतच्या एका बियर शॉपीसमोरील कच्च्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर निजामपूर पोलिसांनी छाप टाकत कारवाई केली. तेथून 9 जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोकडसह जुगाराचे साहित्य असा एकुण 62 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 10 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घनश्याम चंद्रशेखर बेडसे, दिनेश दिलीप बेडसे, कमलेश रमेश देसले, हेमराज नवल बेडसे, सागर प्रकाश कोळी, समाधान निंबा सपकाळ, प्रवीण गोरख अहिराव, प्रल्हाद वामन भामरे, कृष्णा सुभाष सोनार सर्व (रा. छडवेल कोर्डे ता. साक्री) यांना ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई सुनील अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नऊ जणांविरुद्ध निजामपूर पोलिसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.