धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर पायी मोर्चा
धुळे : आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेता आम्हाला अडविण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्याचा इशारा देत खान्देशातील हजारो आदिवासी शेतकरी मुंबई मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले आहेत.
आदिवासी शेतकरी आणि जंगलग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नंदुरबार येथून मुंबई मंत्रालयावर निघालेला पायी बिर्हाड महामोर्चा सोमवारी धुळ्यात धडकला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकरी आपले बिऱ्हाड घेऊन खान्देशातून मंत्रालयाच्या दिशेने पायी जात आहेत.
नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिकसह इतर जिल्ह्यातून मार्गस्थ होत मुंबई मंत्रालयावर मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धुळे पोलिसातर्फे तैनात करण्यात आला होता. मोर्चा धुळ्यात आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आदिवासी शेतकरी, महिलांचा हा मोर्चा १७ दिवसात ४३२ किलोमीटर पायपीट करीत 23 डिसेंबरला मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. सरकारने योग्य निर्णय न घेता मोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.