धुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
धुळे : मानवी मेंदूला नशा देणाऱ्या औषधांच्या बाटल्या आणि गोळ्या विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पर्दाफाश केला आहे. धुळे क्राईम ब्रांचने या रॅकेटमधील चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या रॅकेटमध्ये एका मेडीकल व्यावसायिकाचाही समावेश आहे.
टिप मिळाली अन् पोलिसांनी छापा टाकला : १२ डिसेंबरला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना टिप मिळाली होती. त्यानुसार विकास ऊर्फ विक्की मोहन चौधरी (रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे) याने त्याच्या राहत्या घरात मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन ठेवला असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी आणि एलसीबी पथकाला दिल्या.
त्यानुसार एलसीबीच्या पथकाने विकास ऊर्फ विक्की मोहन चौधरी (वय ३६, रा. दंडेवाला बाबानगर, मोहाडी) याच्या घरात छापा टाकला. घराची झडती घेतली असता, त्यात गुंगीकारक औषधाच्या बाटल्या व गोळ्यांचा साठा आढळला. त्यांच्या घरातून २६ हजार रुपये किमतीच्या Codein Phosphate हा प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या 170 बाटल्या आणि पाच हजार 120 रुपये किमतीच्या Alprazolam हा प्रतिबंधीत गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांच्या १६० स्ट्रीप जप्त केल्या.
विक्की चौधरीने लुकेश चौधरीकडून घेतला होता माल : हा माल त्याने लुकेश चौधरी (रा. देवपूर, धुळे) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार लुकेश अरुण चौधरी (वय ३०, रा. देवपूर) याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने हा माल अवैधरित्या रिंकु मेडीकलचे मालक प्रमोद येवले यांच्याकडे असल्याचे सांगितले. पथकाने प्रमोद अरुण येवले (वय ३४, रा. देवपूर धुळे) याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याच्या राहत्या घरातुन गुंगीकारक माल काढुन दिला. त्यानुसार ३६ हजार ७५० रुपये किमतीच्या Codein Phosphate हा प्रतिबंधीत गुंगीकारक घटक असलेल्या २१० बाटल्या त्याच्या घरातून जप्त करण्यात आल्या.
प्रमोद येवलेने मुकेश पाटीलकडून घेतला होता माल : गुंगीकारक औषधांचा माल त्याने वाडीभोकरच्या मुकेश पाटीलकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्याचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले. मुकेश आनंदा पाटील यानेही गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या राहत्या घरातुन ३० हजार रुपये किमतीच्या Codein Phosphate हा प्रतिबंधीत गुंगीकारक घटक असलेल्या २०० बाटल्या तसेच पाच हजार ७६० रुपये किमतीच्या Alprazolam हा प्रतिबंधीत गुंगीकारक घटक असलेल्या गोळ्यांच्या १८० स्ट्रीप जप्त करण्यात आल्या.
सव्वा लाखाचा अवैध औषधसाठा जप्त : या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख तीन हजार ६३० रुपये किमतीच्या गुंगीकारक औषधाच्या ५८० बाटल्या आणि गुंगीकारक औषधाच्या ३४० स्ट्रीप (५१०० गोळ्या) जप्त करण्यात आल्या.
तिघांना केली अटक : याप्रकरणी विकास ऊर्फ विक्की मोहन चौधरी (वय ३६), लुकेश अरुण चौधरी (वय ३०), प्रमोद अरुण येवले (वय ३४) आणि मुकेश आनंदा पाटील (वय ३५) यांच्याविरुद्ध मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला. चौघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक योगेश
राऊत, अमरजित मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोंडे, हवालदार संदिप सरग, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, चेतन बोरसे, प्रशात चौधरी, कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ चालक कॉन्स्टेबल कैलास महाजन व राजु गिते अशांनी केली.