जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा राजीनामा
धुळे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा आपण विभागीय आयुक्तांकडे पाठविला असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांचे सासरे प्रा. अरविंद जाधव उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर अध्यक्षपद विभागून दिले आहे. त्यानुसार अश्विनी पाटील यांचा कार्यकाळ संपला होता अशी चर्चा आहे. तसेच अविश्वास ठराव, उचलबांगडीच्या चर्चा देखील गेले काही दिवस सुरू होत्या. तसे घडण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. अध्यक्षपदाच्या १४ महिन्याच्या काळात लोकांच्या स्मरणात राहतील, अशी कामे केल्याची प्रतिक्रिया दिली. पक्ष श्रेष्ठींशी प्रत्यक्ष चर्चा करुन आनंदाने राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्षा कोण असतील याची उत्सुकता आहे. रेसमध्ये सध्या भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कामराज निकम यांच्या पत्नी कुसुम निकम, साक्रीचे भाजप नेते आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे ज्येष्ठ बंधू सुरेश रामराव पाटील यांच्या पत्नी मंगला पाटील, गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर डी. आर. पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेला जि. प. चे माजी सदस्य प्रा. अरविंद जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि पंचायत समिती सभापती वंदना मोरे उपस्थित होत्या. अश्विनी पाटील यांच्या वतीने प्रा. अरविंद जाधव यांनी भूमिका मांडली. भाजपच्या राज्य पातळीवर व जिल्हास्तरावरील नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून झालेल्या चर्चा आणि विचारविनियमयानुसार १४ डिसेंबर रोजी जि. प. अध्यक्ष पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे समक्ष सादर करणार आहोत. पक्ष नेतृत्वाने सर्वसामान्य कार्यकर्त्यास दिलेल्या संधीचे सोने करीत सव्वा वर्षाच्या कालखंडात लोकांच्या स्मरणात राहतील अशी सर्वांगिण विकासाची कामे करु शकतील याचा मला सार्थ अभिमान असल्याचे अश्विनी पाटील यांनी म्हटले आहे.
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाल्यानंतर अश्विनी पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. गेल्या १४ महिन्यांचा कार्यकाळात पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण यासह विविध विभागांच्या शेकडो कोटी रुपयांच्या योजना मंजुर करणे आणि जिल्ह्यामध्ये त्याची सुनियोजीतपणे अंमलबजावणी करणे यात यश मिळाल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला. जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, आरोग्य सभापती महावीरसिंग रावल, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांच्यासह जि. प. च्या तत्कालीन सीईओ बुवनेश्वरी एस. आणि विद्यमान सीईओ शुभम गुप्ता यांचे सहकार्य लाभले.
५६ पैकी ४० गटांचे भाजपचे तर १६ गटांमध्ये विरोधी पक्षाचे सदस्य होते. विकासकामे सर्व ५६ गटांमध्ये करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. १४ महिन्याच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त विषय आले. ते संयमाने हाताळले. कोणावर आरोप प्रत्यारोप न करता पक्षात राहुन आनंदाने राजीनामा देत असल्याचे अश्विनी पाटील म्हणाल्या.