धुळे जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींना पळविले
धुळे : अवघ्या नऊ वर्षांच्या बालिकेला एका अठरा वर्षांच्या मुलाने पळवून नेल्याची घटना घडली असून, अशाच प्रकारच्या अन्य एका घटनेत वसतिगृहातील 16 वर्षीय मुलगीदेखील सैराट झाली आहे.
तालुक्यातील अजंग शिवारातून व साक्रीतील महाविद्यालयातून अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. धुळे तालुक्यातील एका गावाच्या शेत शिवारातून नऊ वर्षीय मुलीला गावातील 18 वर्षाच्या मुलाने काहीतरी फुस लावून पळवून नेले. दि. 19 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. शेतात राहणार्या मुलीच्या वडीलांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मुळ कळमसरे ता. अमळनेर व सध्या अजंग शिवारात राहणार्या संशयीत आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.
दरम्यान, साक्री शहरातील एका वसतिगृहातील 16 वर्षीय मुलीला कोणीतरी पळवून नेले. 14 डिसेंबर रोजी ही घटना घडली. याबाबत वसतिगृहाच्या गृहपाल प्रज्ञा पाटील यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल विसपुते करीत आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात चिमुकल्याचा मृत्यू, आई जखमी
धुळे : सुरत-नागपूर महामार्गावरील तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात झालेल्या विचित्र अपघातात सहा वर्षीय बालक ठार झाला. तर त्याची आई जखमी झाली. याप्रकरणी तालुका पोलिसात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यप्रदेशातील सेंधवा येथील जिरीझामली येथे राहणारा भागिराम दुरसिंग बामनिया (वय 26) हा त्याचा सहा वर्षीय मुलगा श्रावण व पत्नीसह एम. पी. 46 एम. टी. 6907 क्रमांकाच्या दुचाकीने 14 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महामार्गाने जात होता. पुरमेपाडा गाव शिवारात रस्त्याचे काम सुरू होते. एम. एच. 04 एल. क्यू. 4294 क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून समोरून येणार्या एम. एच. 18 बी. जी. 4434 क्रमांकाच्या टँकरला जोरदार धडक दिली. त्यामुळे टँकरमागे चालणार्या दुचाकीला धक्का लागून अपघात झाला.
दुचाकीस्वार भागिराम याची पत्नी जखमी झाली. तर मुलगा श्रावण हा डोक्याला मार असल्याचे ठार झाला. याबाबत भागिराम बामनिया याने कंटेनर चालकाविरोधात तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.
पतीच्या अनैतिक संबंधास विरोध, पत्नीला आत्महत्येस केले प्रवृत्त, 8 जणांवर गुन्हा
धुळे : पतीचा दोन महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध करीत असल्याच्या कारणावरून पत्नीला पतीसह सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले.
याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उज्वला रामदास मोरे (वय 30, रा. वडेल, ता. धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत श्रीराम रतन गर्दे (वय 57, रा. आर्वी, ता. धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयत उज्वला हिचा सन 2020 पासूून सासरी छळ करण्यात आला. तसेच तिचा पती रामदास देविदास मोरे (वय 31) याचे दोन महिलांशी अनैतिक संबंध होते. त्यास विरोध करीत असल्याचा कारणावरून तिला पतीसह सासरे देविदास गजमल मोरे, सासु जिजाबाई देविदास मोरे, नणंद बायजाबाई हिंमत पाटील (सर्व रा. वडेल), नणंद पुजाबाई विजय मासुळे (रा. चिंचवार ता. धुळे), नणंद पार्वताबाई विजु वडपते (रा. रावळगाव ता. मालेगाव), देवकाबाई जगन मोरे व छोटीबाई आनंदा पाटील (रा. वडेल) यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. उज्वला हिने 14 डिसेंबर रोजी सायंकाळी देविदास गजमल मोरे यांच्या शेतात विहिरीजवळ आत्महत्या केली.
याप्रकरणी वरील आठ जणांविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात भादंवि कलम 109, 306, 498 (अ), 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ई. कचरे करीत आहेत.
बनावट दस्तऐवजाव्दारे हडपली जमिन, कर्जही घेतले, पाच जणांवर गुन्हा
शिरपूर : शासकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या मदतीने बनावट दस्तऐवजाव्दारे जमिन हडप करीत आमोदेतील महिलेची फसवणूक केली. त्यावर बँकेतून कर्जही घेतल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पमाबाई उर्फ गुलाबराव विठ्ठलसिंग राजपुत (वय 58, रा. आमोदे, ता. शिरपूर) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची सामाईक मालकी असलेली मौजे भोरखेडा ता. शिरपूर येथील गट नं. 134/2/अ ही मिळकत जयसिंग हलका राजपूत, जयपालसिंग जयसिंग राजपूत (रा. भोरखेडा), जितेंद्रसिंग उदेसिंग राजपुत (रा. आमोदे) यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हडप केली. भूमिहीन करण्याच्या उद्देशाने तिघांनी लिहून देणारी निनावी महिला व ओळख देणारे जी. एस. शिरसाठ यांनी संगनमत करीत शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या मदतीने बोगस दस्तऐजव तयार करून बनावटीकरण करीत फिर्यादी व परिवाराची फसवणूक केली. तसेच दस्त हे बनावट असलेल्याचे माहिती असताना देखील जयपालसिंग राजपूत याने ते खरे म्हणून वापरून बँकेतून कर्ज घेतले.
याप्रकरणी वरील पाच जणांवर भादंवि कलम 420, 468, 471, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत.