आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे
धुळे : समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्ती जोपर्यंत आत्मनिर्भर होत नाही, आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारताचे, विकसित भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यामुळेच गेल्या ९ वर्षांत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढली आहे. यातून भारताला आत्मनिर्भर करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करूया, असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
कुंडाणे-वरखेडी (ता. धुळे) येथे आज ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेतील रथाद्वारे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, ज्येष्ठ नेते उत्कर्ष पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, रितेश परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, सुभाष पाटील, श्याम बडगुजर, हरीश शेलार, भय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आर. के. माळी, छोटू मासुळे, राजू पाटील, अरविंद रणदिवे यांच्यासह महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर २०४७ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे, विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारताला आणि देशातील जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे समाजातील विविध गोरगरीब, वंचित घटकांसाठी ७० हून अधिक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची तळागाळातील शेवटच्या व्यक्तींना माहिती व्हावी, त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा म्हणून ही विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.
लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते योजनांच्या लाभापासून वंचित महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना कार्डचे वाटप, घरकुल, उज्ज्वला योजना, महिला बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत, आभा कार्डचे वितरण आदी योजनांचा लाभ देण्यात आला.