शिरपूर पोलिसांनी विदेशी दारूची तस्करी रोखली, 33 लाखांचा मद्यसाठा जप्त
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड आरटीओ चेकपोस्टजवळ शिरपूर तालुका पोलिसांनी एक कंटेनर पकडला असून, त्यातून सुमारे 33 लाख रूपये किमतीचा विदेशी दारूसाठा जप्त केला.
पंजाब राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक केली जात होती. या तस्करीमागे राज्य सरकारचे उत्पादन शुल्क चुकविण्याचाही उद्देश होता. शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, दहा हजारांचा रिवार्डही जाहीर केला.
मध्यप्रदेशच्या सेंधवा येथून शिरपूरकडे कंटेनरमधून दारुची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची टिप शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गस्ती पथकाच्या पोलिसांनी शोध सुरु केला. हाडाखेड गावाजवळील सुळे फाट्याजवळ डी. डी. ०१ ई. ९८९५ क्रमांकाचा कंटेनर जाताना आढळून आला. हे वाहन थांबवून चालकाला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव नरेशकुमार तोगाराम जाट (वय २०, रा. कुंडावा जि. बारनेर, राजस्थान) असे सांगितले. वाहनांची पंचासमक्ष तपासणी केली असता या कंटेनरमध्ये फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी असलेली दारु होती. महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारु विकण्याचा मााफियांचा बेत होता.
वेगवेगळ्या ब्रॅंडेड कंपन्यांची दारू : आयशरमध्ये १५ लाख ८४ हजार रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन, तीन लाख ६४ हजार ८०० रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज, १३ लाख ६८ हजार रुपये किंमतीची रॉयल स्टॅग आाणि २० लाख रुपये किंमतीचे वाहन असा ५३ लाख १६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई : पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ, पीएसआय संदीप पाटील, सुनील वसावे, हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, संतोष पाटील, अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा