धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की
धुळे : भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपची सत्ता असलेल्या धुळे महानगरपालिकेच्या महासभेत जोरदार राडा केला. अन्यायकारक मालमत्ता कर कमी करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली; तसेच महिला कार्यकर्त्यांनाही ढकलण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी केला.
घरपट्टीप्रश्नी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिकेचे सभागृह दणाणून सोडले. व्यासपीठावर बसलेल्या महापौरांसमोर सत्ताधारी नगरसेवकांनी कडे करत राष्ट्रवादीच्या आक्रमक आंदोलकांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. या रेटारेटीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलांना ढकलून देण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे. अन्यायकारक घरपट्टीतून धुळेकरांना दिलासा मिळावा ही महापौरांसह सत्ताधारी भाजपाची मानसिकता नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी केला.
नेमके काय घडले? : वाढीव घरपट्टीचा ठराव ताबडतोब विखंडीत करावा, अशी मागणी कैलास चौधरी यांनी केली. महासभेत राडा होण्याची पूर्वकल्पना असल्याने सचिव मनोज वाघ यांनी नगरसेवक आणि पत्रकार, छायाचित्रकार सोडून इतरांनी सभागृहातून बाहेर जावे, अशा सूचना वारंवार केल्या. मात्र तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी महिला, कैलास चौधरी, रवींद्र आघाव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, शहर महिलाध्यक्षा जया साळूंखे आणि इतर कार्यकर्ते सभागृहात येवून बसलेले होते. आपल्याला बाहेर काढले जावू शकते हा अंदाज आल्याने जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी सभागृह दणाणून सोडले. घरपट्टी वाढ रद्द करा अशा आशयाचे बॅनर झळकावत या आंदोलकांनी व्यासपीठाच्या दिशने कुच केली. राष्ट्रवादीच्या या आक्रमक आंदोलनामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. घरपट्टी वाढ रद्द करा, अशा घोषणा देत आंदोलक व्यासपीठाजवळ पोहचले. तोपर्यंत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक नागसेन बोरसे, सुनील बैसाणे, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, हर्षकुमार रेलन हे आंदोलकांजवळ पोहचले. आंदोलक महापौरांपर्यंत पोहचतील असे वाटल्याने त्यांनी आंदोलकांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक आंदोलकांपुढे सुरुवातीला त्यांचे काही चालले नाही. शाब्दीक वादाला सुरुवात झाली. गोंधळ आणखीनच वाढला. या गोेंधळात धक्काबुक्की झाल्याचाही आरोप केला गेला. काही नगरसेवकांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक पुन्हा घोषणाबाजी देत सभागृहाबाहेर निघाले.
पब्लिसिटी स्टंट असल्याचा महापौरांचा आरोप : राष्ट्रवादीचे आंदोलक बाहेर निघाल्यानंतर महापौर प्रतिभा चौधरी यांनी आंदोलकांची ‘घुसखोर’ शब्द उच्चारत टिका केली. पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका : जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाढीव घरपट्टीप्रश्नी दुसरा अल्टिमेटम देण्यासाठी सभागृहात आलो होतो. याआधी एकदा आंदोलन करुन महापालिकेला घरपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी केली होती. महासभा सुरू होण्याची वेळ सकाळी ११ वाजेची असताना ११.४५ वाजता महासभा सुरु होते. म्हणजेच महापालिकेतील नगरसेवक काम करण्यासाठी लायक नाहीत, हे दिसून येते. यातून त्यांची उदासिनता स्पष्ट होते. घरपट्टी वाढीचा ठराव विखंडीत करता येवू शकतो. परंतु सत्ताधार्यांनी तो केला नाही. धुळेकरांना दिलासा मिळावा ही सत्ताधार्यांची मानसिकता नाही. आंदोलन करणार्या आमच्या महिला पदाधिकार्यांना ढकलून दिल्याचा आरोपही कैलास चौधरी यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या काळात हा ठराव झाल्याचे सांगितले जाते. परंतु त्यावेळी देखील आम्ही ठरावाला विरोधच दर्शवला होता. त्यावेळच्या महापौरांनी नेमके काय केले हे आम्हाला माहीत नाही. हा ठराव विखंडीत करावा, अशी आमची मागणी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केल्याची माहितीही कैलास चौधरी यांनी दिली.
हेही वाचा