जनतेच्या समस्यापूर्तीची अपेक्षा माझ्यासाठी प्रशंसनीय बाब : खासदार डॉ. सुभाष भामरे
धुळे : खासदार म्हणून धुळे शहरातील कॉलन्या- कॉलन्यांतील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आदी समस्या सोडविण्यासाठीची माझ्याकडून होणारी अपेक्षा ही माझ्या स्वतःसाठी गौरवाची, प्रशंसनीय बाब असल्याचे मी मानतो. म्हणून लोकांचा सेवक, प्रतिनिधी म्हणून धुळे शहरातील कॉलन्या-कॉलन्यांसह संपूर्ण शहराच्या विकासासाठी मी अधिकाधिक निधी आणून जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे केले.
शहरातील देवपूरमधील प्रभाग एकमधील राजगुरूनगर, अक्षय कॉलनी, गवळेनगर परिसरातील काँक्रिटीकरण व डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती किरणताई कुलेवार, प्रभागाचे नगरसेवक नरेश चौधरी, रंगनाथ ठाकरे, नगरसेविका विमलबाई पाटील, वंदना भामरे, माजी महापौर तथा नगरसेवक भगवान गवळी, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, चंद्रजित पाटील, चंद्रकांत जाधव, गोपीचंद पाटील, योगेश सनेर, पितांबर कोठावदे, दिनेश पोतदार, अतुल ठाकरे, सागर पाकळे, बी. ए. पाटील, भरत चौधरी, राजेंद्र सावंत, सतीश माळी, अशोक पाटील, छोटू ठाकरे, जितेंद्र पाटील, अनिल अमृतकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी परिसरातील श्री महादेव व गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. यानंतर काँक्रिटीकरण व डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे खासदार डॉ. भामरे, माजी आमदार कदमबांडे, स्थायी सभापती किरणताई कुलेवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
निधीसाठी केंद्र, राज्याकडे पाठपुरावा : प्रारंभी नगरसेवक चौधरी, नगरसेविका भामरे यांनी प्रभागातील विविध प्रलंबित समस्यांबाबत खासदार डॉ. भामरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. तसेच आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत खासदार डॉ. भामरे यांचे आभारही मानले. खासदार डॉ. भामरे म्हणाले, की प्रभागाचे नगरसेवक नरेश चौधरी, वंदना भामरे यांनी प्रभागातील विविध समस्यांबाबत आज व्यथा मांडल्या. खरे तर या व्यथा त्यांनी शहराच्या महापौर, स्थायी समिती सभापतींकडे मांडायला हव्यात. असे असले तरी शहराचा पालक व खासदार म्हणून या समस्यापूर्तीची जबाबदारी आपण झटकणार नाही. प्रभागातील लहान-मोठी कामे माझ्याकडे मांडल्यानंतर त्यासाठी केंद्रासह राज्य शासनाकडून विविध योजनांद्वारे निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. यामुळेच शहरातील विविध गल्ल्यांतील, कॉलन्यांतील समस्या सोडविण्याबाबत आपल्याकडून केली जाणारी अपेक्षा माझ्यासाठी प्रशंसनीय ठरते. याद्वारे शहराच्या विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न होत आहे.
औद्योगीकरणाला चालना : शहराच्याच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाला चालना दिली जात आहे. यातूनच धुळे-नरडाणा रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ-कनोली सिंचन योजनेसह अक्कलपाडा पाणी योजना आदी कामे मार्गी लागली आहेत. नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या उद्योगांची संख्या वाढत आहे. या उद्योगांसाठी महामार्गांचे जाळे, धुळे- नरडाणा रेल्वेमार्गाची कनेक्टिव्हिटी तसेच सुलवाडे- जामफळ योजनेद्वारे उपलब्ध होणारा मुबलक जलसाठा आदी पायाभूत सुविधा फायद्याच्या ठरत आहेत. यापुढेही धुळे शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी उर्वरित विकासकामांसाठीही केंद्र, राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली.
प्रभागातील नागरिकांचे खासदारांना निवेदन
प्रभाग एकमधील राजगुरूनगरमधील महादेव मंदिराला सभामंडप उभारणे, कॉलनीतील अन्य रस्त्यांची कामे करणे, संकल्प कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामे करावीत, मोकळ्या भूखंडाला संरक्षक भिंत बांधणे, नवीन जलवाहिन्या टाकणे, गटारांची कामे करणे आदी समस्यांचे नागरिकांनी खासदार डॉ. भामरे यांना निवेदन दिले. या निवेदनांची दखल घेत पुढील काळात या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार डॉ. भामरे यांनी दिले.