शिरपूर तालुका पोलिसांनी आणखी 16 लाखांचा मद्यसाठा पकडला
शिरपूर : तालुक्यातील सांगवी येथील शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सध्या विदेशी उच्च प्रतीच्या दारूचे खोकेच्या खोके जमा झाले आहेत. पंजाब राज्यातून तस्करी करून आणलेला 33 लाखांचा मद्यसाठा पकडायला 24 तासही उलटले नसताना येथील पोलिसांनी मंगळवारी पुन्हा त्याच राज्यातून आणलेली 16 लाखांची दारू पकडली.
सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी सलग केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील सेंधव्याकडुन शिरपूरकडे एका आयशर कंपनीचे प्रो-३०१५ मॉडेलच्या वाहनातून दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला वाहनाचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पेट्रोलींग करीत वाहनाचा शोध घेत असतांना पथकाला संशयीत वाहन (क्र.एन.एल. ०७, ए.ए. ३५०३) हाडाखेडा गावाजवळील हॉटेल जय बाबारी येथे मिळुन आले. वाहनावरील चालकाने त्याचे नाव सुनिलकुमार राजपाल जाट (वय २८ रा. धानीसरल ता. तोसाम जि. भवानी, हरियाणा) असे सांगीतले. वाहन पोलिस ठाण्यात आणुन सिल तोडुन वाहनाची तपासणी केली असता त्यात फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी असलेली दारू आढळून आली. ही दारु महाराष्ट्र राज्यात विक्री करून शासनाचा कर बुडवुन फसवणुक करीत असल्याने निदर्शनास आले.
एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त : म्हणून २ लाख ४२ हजार ४०० रुपये किंमतीचे ऑलसिजन कंपनीच्या ७५० एम.एल.चे एकुण ४० खोके, ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किंमतीचे रॉयल चॅलेंजचे ७५० एम.एल.चे एकुण ६० खोके, १ लाख ५ हजार ६०० रुपये किंमतीची मॅकडॉल नं. ०१ चे ७५० एम.एल.चे एकुण २० खोके, ९ लाखांचे मॅकडॉल नं. ०१ चे १८० एम.एल.चे एकुण १५० खोके, २१ हजार ६०० रुपये किंमतीची कॉसबर्ग कंपनीचच्या बियरचे ५०० एम.एल.चे एकुण १० खोके व १५ लाखांचा ट्रक असा एकुण ३१ हजार ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, संदिप ठाकरे, कॉन्स्टेबल योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, अल्ताफ मिर्झा यांनी केली.
हेही वाचा