मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन रद्द करा, सकल मराठा समाजाचे धुळ्यात आंदोलन
धुळे : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले छगन भुजबळ यांना कोर्टाने दिलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या मागणीसाठी सकल मराठा समाजाने क्यू माईन क्लब रस्त्यावर जोरदार निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांना आजारपणाच्या कारणावरून जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्यांच्या राजकीय वागणुकीवरून ते आजारी असल्याचे वाटत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध ठिकाणी सभा, आंदोलने, मोर्चा होत आहेत. तसेच प्रत्येक जिल्हा व ग्रामीण स्तरावर शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार देखील सकारात्मक आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नात सरकार असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्यामधील जामिनावर सुटलेले सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाला जमा करून त्यांची दिशाभूल करीत आहेत. मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी ते विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत. त्या सभांमध्ये ते एका तरुणाला लाजवेल याप्रमाणे जोरजोरात सलग एक ते दोन तास भाषण देतात. त्यांच्या सभांमध्ये ते मराठा समाजाला टार्गेट करताना दिसतात व स्पष्टपणे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडू शकते व शांततेला देखील गालबोट लागून काही अनैतिक घटना घडू शकते.
मंत्री छगन भुजबळ हे मागील काळात महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या गंभीर गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते. तसेच त्यांच्याविरुद्ध ठोस असे पुरावे देखील सापडले होते. परंतु जेलमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी आजारपणाचे सोंग घेतले आणि आपली जामीनवर सुटका करून घेतली. कारण आता ते घेत असलेल्या सभांमध्ये त्यांची देहबोली, जोरजोरात भाषण देणे यावरून ते आजारी असल्याचे कुठेही दिसून येत नाही. म्हणजेच मंत्री छगन भुजबळ यांनी कोर्टाची देखील फसवणूक केली आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन त्वरित रद्द करून त्यांना परत तुरुंगात पाठविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा व त्यांचा जामीन त्वरित रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुधाकर बेंद्रे, दीपक रौंदळ, मनोज ढवळे, राजेंद्र काळे, भैय्या शिंदे, राजेंद्र मराठे, संतोष लकडे, अभिनव पाटील, सुरेश पवार, बाजीराव खैरनार, प्रकाश गिरमकर, राकेश भोसले, पप्पू माने, राजेंद्र काळे, आबा कदम, हेमंत भडग, उमेश केवारे, वीरेंद्र मोरे, उल्हास यादव, गोविंद वाघ, अनिताताई वाघ आदी उपस्थित होते.